ठाणे – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० व्या) जयंती वर्षानिमित्त ठाण्यातील मंदिरात ज्ञानोबा माऊलींचा गजर दुमदुमणार आहे. दिंडी, प्रवचन, भजन कीर्तनात हा भक्तीमय सोहळा रंगणार आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचे वर्ष म्हणजे २०२५ हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे ७५० वे जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, ठाणे यांच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शनिवार, ९ ऑगस्ट पासून मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सुरु झाले असून, या पारायणास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

ठाण्यातील पांचपाखाडी भागात ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर आहे. श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्यावतीने येथे विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात. यंदाच्या ७५० व्या जयंती निमित्त ठाणे महापालिका आणि श्री ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ आणि १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० प्रवचन असणार आहेत. आळंदी येथील ह. भ. प. डॉ. ॲड. यशोधन किसन महाराज साखरे माऊलींचे अवतार कार्य यावर प्रवचन करणार आहेत.

तर १५ ऑगस्ट रोजी पहाटेपासून विविध कार्यक्रम असणार आहेत. पहाटे ४ वाजता माऊलींची काकड आरती, ६ वाजता अभ्यंग स्नान, ११ वाजता महिला भजनी मंडळाचे भजन, ४.३० ते ६.३० वाजता भव्य दिंडी, तर रात्री १० वाजता कीर्तनकार: ह. भ. प. रामदास महाराज थोरात यांचे श्रीकृष्ण जयंती हरिकीर्तन असणार आहे. या सोहळ्यास वारकरी संप्रदाय आणि माऊली भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संस्थेने केले आहे.

नक्की कार्यक्रम कोणते आणि कधी ?

प्रवचन

  • दिनांक: १४ व १५ ऑगस्ट
  • वेळ: सायंकाळी ७.०० ते ८.३०

प्रवचनकार : ह. भ. प. डॉ. ॲड. यशोधन किसन महाराज साखरे (आळंदी)

विषय : माऊलींचे अवतार कार्य

१५ ऑगस्ट – माऊली जयंती विशेष कार्यक्रम

  • ४.०० वा. (पहाटे) – माऊलींची काकड आरती
  • ६.०० वा. – अभ्यंग स्नान
  • ११.०० वा. — महिला भजनी मंडळाचे भजन
  • ४.३० ते ६.३० वा. – भव्य दिंडी
  • १०.०० वा. (रात्री) – श्रीकृष्ण जयंती हरिकीर्तन

कीर्तनकार : ह. भ. प. रामदास महाराज थोरात