ठाणे : नौपाडा परिसरातील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत यंदा पहिल्यांदाच विद्यार्थी, पालक व्यापार पेठ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. यामध्ये पणती, आकाश कंदील, उटणे, साबण, फराळ, किल्ले, भेटकार्ड, रांगोळी, हस्तकलेच्या वस्तू अशा विविध वस्तू आहेत. तसेच मेणापासून वडापाव, समोसा, फराळ, चहा बिस्कीट अशा आकर्षक वस्तू देखील तयार केल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे ही व्यापार पेठ आकर्षक ठरत आहे.
शिक्षणासोबतच आर्थिक नियोजनासह आत्मनिर्भरतेचे धडे विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने सरस्वती मंदिर ट्रस्टच्यावतीने पालक विद्यार्थी व्यापार पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्धाटन गुरूवारी कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे आणि माजी विद्यार्थी विजय बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या व्यापार पेठेत २० ते २२ स्टॉल लावण्यात आले आहेत. हा उपक्रम शुक्रवार, १७ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्व देत असल्याचे दिसून येते.
याचप्रमाणे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने दिवाळी निमित्त ‘विद्यार्थी पालक व्यापार पेठ’ आयोजित केली आहे. या व्यापारपेठेचे प्रमुख घोषवाक्य हे उद्योग, व्यापार, कौशल्य विकास!, आत्मनिर्भर देश, हाच अमुचा प्रयास! हे आहे. विद्यार्थी पालक व्यापारपेठ हा शाळेचा नवा उपक्रम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी वस्तू स्वत: तयार करून त्या विक्रीसाठी मांडलेल्या आहेत. यात पणती, आकाश कंदील, उटणे, साबण, फराळ, किल्ले, भेटकार्ड, रांगोळी, हस्तकलेच्या वस्तू अशा विविध वस्तू आहेत. या वस्तू १० रूपयांपासून विकल्या जात आहेत.
मेणाच्या खाद्य पदार्थांचे विशेष आकर्षण
व्यापारपेठेतील एका स्टाॅलवर पालकांनी मेनापासून विविध वस्तू तयार केल्याचे पहायला मिळत आहे. मेनापासून समोसा, केक, वडापाव, फुले, करंजी, गुलाबजाम, रसमलाई, चहा बिस्कीट अशा विविध खाद्य वस्तू तयार केलेल्या आहेत. या वस्तू ५० ते ३०० रूपयांपर्यंत आहेत. या वस्तूंचा वापर दिवाळीत पणती लावण्यासाठी किंवा लगनसराईत सजावटीसाठी उपयुक्त असल्याचे पालक अनघा बर्वे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारताचे धडे देण्यासाठी आणि त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. – सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे</strong>
व्यापार केला तर देशाचा विकास होईल. फक्त रोजगार म्हणून राहू नका, रोजगार द्यायला शिका. आपल्याला उद्योजक घडवायचे आहेत. तसेच शिक्षणासोबत संयम ठेवा, विचार करा कोणता व्यापार करायचा आहे, आत्मपरिक्षण करा आणि आत्मनिर्भर व्हा. तुमचा विकास झाला तर भारत देशाचे नाव नक्कीच उंचावेल. – विजय बेंद्रे, माजी विद्यार्थी आणि ठाण्यातील सराफ