ठाणे : भिवंडी येथील फेणे गावात शनिवारी सकाळी एका घरात एक महिला आणि तिच्या तीन मुली अशा चौघांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या महिलेचा पती सकाळी कामावरून घरी परतला, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या चौघांचे मृतदेह स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या महिलेने आत्महत्या करीत असल्याचे मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले असले तरी त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
भिवंडी येथील फेणे गावातील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हे आपल्या कुटूंबासोबत राहतात. त्यांचा पत्नी पुनीता (३२) आणि मुलगी नंदिनी (१२), नेहा (७) आणि अनु (४) असा परिवार होता. लालजी भारती हे यंत्रमाग कामगार असून शहरातील एका यंत्रमाग कारखान्यात काम करतात. लालजी हे शुक्रवारी रात्री कारखान्यात कामावर गेले होते. त्याच्या घरी पत्नी आणि तीन मुली होत्या. लालजी हे सकाळी कामावरून घरी परतले. त्यांनी घराचा दरवाजा ठोकला पण, पत्नी किंवा मुलींनी दार उघडले नाही. यामुळे त्यांनी घराची खिडकी उघडली आणि यात डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह घरातील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घराचा दरवाजा उघडला.
भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि त्यानंतर चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. घटनास्थळी पोलिसांना महिलेने लिहीलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात स्वतःच्या मर्जीने करीत असून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहीले होते. असे असले तरी या महिलेने मुलींसह आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून त्याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच या चिठ्ठीनुसार महिलेने आत्महत्या केली असली तरी, तिच्या मुलींनी आत्महत्या केली की त्यांची महिलेने हत्या केली, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत, अशी माहीती पोलीस सुत्रांनी दिली.
भिवंडी येथील फेणे गावातील एका घरात एका महिलेसह तीन मुलींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या चौघांचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
डाॅ. मोहन दहीकर, पोलिस उपायुक्त, भिवंडी