ठाणे- हिंदू मराठी नववर्ष निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून ठाणेकरांची मने जिंकली. परंतु, यंदा केवळ चार -पाच पाऊले न चालता चक्क दगडी शाळेपासून ते गोखले रोडपर्यंत ते पायी सहभागी झाल्याने ठाणेकर अचंबित झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह आहे का, असा अनेकांना प्रश्न पडला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत झाल्याचे चित्र होते. यामुळे काही ठाणेकर मंडळींनी नाराजी देखील व्यक्त केली.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासामार्फत दरवर्षी हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्या निमित्त स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. या स्वागत यात्रेची सुरुवात श्रीकौपिनेश्वर मंदिरापासून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे ते वर्षानुवर्ष या यात्रेत सहभागी होत असतात. मुख्यमंत्रीपदी विराजमन झाल्यावर त्यांनी या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. गुढीपाडव्या दिवशी सकाळी ७ वाजता कौपिनेश्वर मंदिरातून पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार वाजत-गाजत प्रस्थान होते. जांभळीनाका येथील सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन पालखी पुढे जांभळी नाक्यावर येते. त्याठिकाणी शहरातील विविध संस्थांचे रथ एकत्र येत स्वागत यात्रेला सुरुवात होते. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही स्वागत यात्रा शहारात फिरते. यंदाही या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. दगडी शाळेजवळ पालखी आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पालखी घेतली. पाच ते दहा मिनिटे ते पालखी घेऊन चालले. त्यानंतर, ते दगडी शाळेपासून ते गोखलेरोडपर्यंत ते पायी स्वागत यात्रेत सहभागी झाले.

हेही वाचा – धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

हेही वाचा – “जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

यामध्ये त्यांनी जिम्नॅस्टिक सादरीकरण, शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण असे मुख्य कार्यक्रम थांबून बघितले आणि सादरकर्त्यांचे कौतूक केले. यामुळे त्याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. परिणामी, पालखी मागोमाग येणारे विविध रथ यांचा क्रम चुकला आणि स्वागत यात्रा पूर्णपणे विस्कळीत झाली. स्वागत यात्रेतील रथ हे ठाणेकरांसाठी आकर्षणाचा भाग असतो. परंतु, यंदा विस्कळीत झालेल्या या स्वागत यात्रेत ठाणेकरांना हे रथ नीट पाहता आले नाही. तसेच यंदाच्या वर्षी स्वागत यात्रेला अधिकचा वेळ लागल्यामुळे काही सहभागी संस्थांनी स्वागत यात्रेचा नेहमीचा मार्ग न निवडता मधूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाणेकर नागरिकांचा स्वागत यात्रेला दरवर्षी सारखा उत्साह दिसून आला नाही. तर, दरवर्षी मुख्यमंत्री हे पालखी सोबत चार ते पाच पाऊलेच चालतात. परंतु, यंदा चक्क दगडी शाळा ते गोखले रोडपर्यंत त्यांनी पायी स्वागत यात्रेत सहभाग नोंदवल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह आहे का, असा प्रश्न ठाणेकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.