ठाणे : राज्यातील सर्वच मलनिस्सारण प्रकल्पांची तपासणी केली जाणार असून त्याठिकाणी प्रक्रीयेविनाच सांडपाणी वाहीनीतून सोडण्यात येत असेल तर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांची मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंगळवारी बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे उपस्थित होते. या बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मलनिस्सारण प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळांकडूनही नाहरकत दाखला देण्यात येतो आणि त्यानंतर पालिका संबंधित बांधकामांना रहिवास प्रमाणपत्र देते. त्यामुळे हे प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेची जितकी आहे, तितकीच प्रदुषण नियंत्रण मंडळाचीही आहे.
यामुळेच राज्यातील सर्वच मलनिस्सारण प्रकल्पांची तपासणी केली जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले. मलनिस्सारण प्रकल्प असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि प्रक्रीयेविनाच सांडपाणी वाहीनीतून सोडण्यात येते. असे तपासणीत आढळून आले असेल तर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांची मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
ओला, सुका आणि ई-कचरा अशा तीन टप्प्यात खरेतर कचऱ्याचे वर्गीकरण होणे गरजेचे असून येत्या काळात नागरिकांच्या मदतीने आम्ही अशाप्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ठाणे महापालिकेकडून कचऱ्याचे वर्गीकरण होत नसले तरी, नागरिकांचीही कचरा वेगळा करून देण्याची जबाबदारी आहे. आपल्या घरापासूनच प्रदुषण कसे कमी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. एकल वापराचे प्लास्टिक निर्मितीची ठिकाणे शोधून त्यावर कारवाई करण्यावर आमचा भर आहे. पण, नागरिकांनीही असे प्लास्टिक वापरणे टाळले तर ते कायमस्वरुपी बंद होईल, असेही ते म्हणाले.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १२० एवढा असून तो मध्यम स्वरुपाचा आहे. परंतु ठाण्याची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे प्रत्येक शहरात ज्या ठिकाणी खाजगी किंवा शासकीय यंत्रणेची कामे सुरु आहेत, त्यांच्या कामांच्या ठिकाणी हवा गुणवत्ता यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाची जाळी बसविण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यात दर दोन महिन्यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रदुषण रोखण्यासाठी उपाय योजना कशा पध्दतीने करता येऊ शकतात, याचे नियोजन आखण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
