ठाणे : शहरातील तलावांमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपुरक सण उत्सव साजरे करण्यावर अधिक भर देत आहेत. यासाठी कृत्रिम तलाव, निर्माल्यासाठी कलशांची निर्मिती पालिकेच्यावतीने केली जाते. यंदाही नवरात्रौत्सवासाठी व्यवस्थापन केले होते. असे असले तरी घट विसर्जन झाले, मात्र विघटन झाले नसल्याचे चित्र आहे.
शहरातील तलावांमध्ये भाविकांनी घट विसर्जन केले मात्र अनेक ठिकाणी घट विघटन न झाल्याने तलावा बाहेर घटाच्या टोपल्याचा ढीग जमा झाला आहे.ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात पुर्वीच्या काळी ७५ हून अधिक तलाव होते. अतिक्रमणामुळे शहरातील अनेक तलाव नामशेष झाले. तर, शहरात सद्यस्थितीत ३६ तलाव शिल्लक राहिले आहे. या तलावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अंतर्गत मागील काही वर्षांपासून पालिका पर्यावरणपुरक विसर्जन संकल्पना राबवित आहे. यात तलावांचे पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात आहे. तसेच निर्माल्यासाठी कलशांची निर्मिती करत आहे.
गुरुवारी रात्री ठाणे शहरात मोठ्या उत्साहात देवी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशे, डिजेचा वापर करत वाजत गाजत मिरवणुका पार पडल्या. मिरवणुकांमध्ये गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. नवरात्रौत्सवानिमित्त विसर्जनासाठी पालिकेने शहरात दहा कृत्रिम तलाव, पाच ठिकाणी लोखंड़ी टाक्या आणि आठ विसर्जन घाट, या ठिकाणी मुर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती. अशाच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले होते.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अनेक नागरिकांनी घरातील घटांचे विसर्जनासाठी ठाण्यातील विविध तलावांवर गर्दी केली. मात्र, तलावाबाहेरच अनेक ठिकाणी घटातील निर्माल्य, टोपल्या, नारळ, फुले, पाने, मातीचे घट आणि पूजेचे साहित्य फेकण्यात आल्याचे चित्र दिसून आले. शहरातील माजीवाडा प्रभाग समिती समोरील तलाव, जेल तलावाचे प्रवेशद्वार, उपवन, मासुंदा अशा विविध तलावांजवळ निर्माल्य कलश असून देखील निर्माल्य बाहेर ठेवल्याचे दृश्य आहे. शहरातील अनेक तलावांमध्ये भाविकांनी घट विसर्जन केले मात्र अनेक ठिकाणी घट विघटन न झाल्याने तलावा बाहेर घटाच्या टोपल्याचा ढीग पडून आहेत. यामुळे तलाव परिसरात अस्वच्छता पसरली आहे. ठाण्यात एकूण १०,५६२ घटाचे विसर्जन करण्यात आले. यातील अनेक घट हे तलावाबाहेरच पडून आहेत.