कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील तीन जणांनी सहा वर्षापूर्वी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले होते. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात तीन जणांवर संशय व्यक्त करुन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींविरुध्द सबळ पुरावे उभे करण्यास तपास अधिकारी अयशस्वी झाल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी खुनाचा आरोप असलेल्या तीन जणांची निर्दोष मुक्तता केली.धम्मरत्न अनिल अचलखांब (३०, रा. जुनी डोंबिवली), अंकुश गणेश कुऱ्हाडे (३०, रा.अण्णानगर झोपडपट्टी, कोपर), अमोल उर्फ वैत्या भास्कर चौधरी (३५, रा. गणेशनगर, रागाई मंदिराजवळ, डोंबिवली) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अरफूल खान असे मारहाणीत मरण पावलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. रिक्षा चालकाची नातेवाईक सरोज बरकत शेख हिने याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरोजने तक्रारीत म्हटले होते, मी एका मटण विक्रेता दुकानात काम करत होते. तेथे माझा दीर अरफुल खानही हाही काही महिने काम करत होता. त्यानंतर त्याने रिक्षा चालविणे पसंत केल्याने तो डोंबिवलीत प्रवासी वाहतूक करत होता. जानेवारी २०१७ मध्ये तीन जणांनी अरफुलला म्हात्रे वाडीतील भवन चाळ येथे रात्रीच्या वेळेत बेदम मारहाण केली. ते रस्त्यावर पडले आहेत, अशी माहिती एका रस विक्रेत्याने तक्रारदार सरोजला दिली. ती तातडीने दुकान मालकासह घटनास्थळी गेली. त्यावेळी अरफुल रस्त्यावर बेशुध्दावस्थेत पडला होता. सरोजने त्याला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा >>>कल्याण जवळील मलंगगड रस्त्यावर खड्डे चुकविताना डंपरखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

अरफुलची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईत जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना अरफुलचा काही दिवसांनी मृत्यू झाला. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात धम्मरत्न, अंकुश, अमोल यांना अटक केली होती. त्यांच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आला होता. या खून प्रकरणात आरोपींचा सहभाग कसा आहे हे सबळ पुराव्यानिशी न्यायालयासमोर दाखल करण्यात तपास अधिकारी कमी पडले. न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकार पक्षाला कात्रीत पकडले. आरोपींच्या वकिलाने आरोपी या प्रकरणात कसे सहभागी नव्हते हे सबळ पुराव्यानिशी दाखवून देण्यात यशस्वी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुध्द सबळ पुरावे नसल्याने निरीक्षण नोंदवत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three persons acquitted of murder of rickshaw puller in dombivli amy