ठाणे : वाहतूक कोंडीची समस्या थांबली नाही तर ठाणेकर रस्त्यावर उतरतील मग नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल आणि याला जबाबदार प्रशासन राहील असे मत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. ठाण्यात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाल्याने मनसेच्यावतीने शनिवारी लाँग मार्च काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

ठाण्यात मागील काही दिवसांपासून वाहतुक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. या विषयावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी सायंकाळी महापालिका ते हरीनिवास सर्कल पर्यंत ट्रॅफिक मार्च काढला होता. या मार्चमध्ये घोडबंदर, हिरानंदनी, दोस्ती अशा विविध ठिकाणाहून नागरिक सहभागी झाले होते. मोर्चामध्ये नागरिकांनी “रस्ते नीट करा आणि दंड घ्या”, “सुविधा देण्यास नाही तयार…करतात नुसता चरणाचा भडीमार”, ” ठाणेकरांनी दिली सत्ता, सत्य ने दिले खड्डे.. प्रशासनाचे भ्रष्ट अड्डे चोहीकडे” ” वाहतूक कोंडीचा मिळेना उतारा चालकांना मात्र दंडाचा मारा” , ” सहन होईना वाहतूक कोंडीचा भार वाहन चालक झाले बेजार” , ” कल्याण फाटा उड्डाणपूल झालाच पाहिजे” अशा आशयाचे अनेक फलक हातात घेऊन नागरिकांनी संताप व्यक्त केला.

यावेळी आमच्याकडून रस्त्यासाठी कर घेतात. मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केले तर कारवाई का केली जाते. आम्हाला व्यवस्थापन पुरविण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंची उत्तम व्यवस्था का नाही केली. महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहन तळ बांधले. परंतु तेथेही पे-अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहचण्यासाठी चार ते साडे चार तास लागतात. ठाण्यात वाहतुक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे असे जाधव म्हणाले. या समस्येसाठी प्रत्येक तरुणाने रस्त्यावर यायला पाहिजे. ठाण्याची लागलेली वाट ठाणे वाहतूक कोंडीमुक्त व्हावे असे वाटत असेल तर एकत्र रस्त्यावर या असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

ठाण्यात फक्त पैसे खाण्यासाठी कामांची टेंडर काढले जातात. ठाणेकरांसाठी ते टेंडर नाहीत. ठाण्याचा विकास थांबलेला आहे, अनेक समस्या वाढल्या आहेत. ठाण्यात एक पूल झालेला नाही. घोडबंदरवर खड्डे झालेत. निधी आला म्हणून वापरायचा इतकेच होते. मूळ ठाणेकरांना काय मिळाले हे दाखवावे असेही ते म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, की ठाण्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवा. त्याचबरोबर ठाणेकरांनी मतदानाच्या वेळेस जागरूक राहून मतदान करा असे आवाहन जाधव यांनी केले.