ठाणे : घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडीमुळे हैराण झालेल्या वाहन चालकांना गुरुवारी पुन्हा एकदा वाहतुक कोंडीचा फटका सहन करावा लागला. घोडबंदर, गायमुख घाट भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक अवजड वाहन दुभाजकावर जाऊन आदळल्याने ही वाहतुक कोंडी झाली असून येथील रहिवासी कोंडीमुळे संतप्त झाले आहेत.

घोडबंदर मार्गावरुन हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच गुजरात येथून भिवंडी, उरण जेएनपीए आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे प्रमाणही घोडबंदर मार्गावर अधिक असते. तसेच मिरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरीवली भागातील नोकरदार, प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावरील घोडबंदर गायमुख घाट परिसराची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो.

गुरुवारी सकाळी मिरा भाईंदर येथील ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एक अवजड वाहन वाहतुक करत होते. हे वाहन मिरा भाईंदर येथील काजुपाडा भागात सकाळी ७ वाजताच्या सुमारास आले असता, अचानक ते येथील एका दुभाजकाला धडकले. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली. गायमुख घाट मार्गावर अरुंद मार्गिका असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. काजुपाडा, घाटातील वर्सोवा पूल भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ९.३० नंतरही वाहतुक कोंडी सुटली नव्हती. अवजड वाहनांना ठाण्यात सकाळी ६ नंतर प्रवेश बंदी असतानाही इतक्या मोठ्याप्रमाणात अवजड वाहने कशी आली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.