अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील सर्वाधिक वर्दळीचा कल्याण बदलापूर राज्यमार्गावरील फॉरेस्ट नाका परिसर गुरूवारी वाहतूक कोंडीत अडकला. येथे असलेल्या एचपी पेट्रोल पंपाशेजारील एका औद्योगिक कंपनीत जाणारा भलामोठा ट्रेलर रस्त्यावरच बंद पडला. त्या रस्त्याने फॉरेस्ट नाक्यावरून अंबरनाथकडे जाणारी निम्म्यापेक्षा अधिकची मार्गिका अडवली. त्यामुळे फॉरेस्ट नाक्यावरून जाणारी वाहने या ठिकाणी अडकली. परिणामी फॉरेस्ट नाक्यावरील सिग्नल यंत्रणाची व्यवस्थाही मोडकळीस आली. सकाळी नोकरी, धंद्यानिमित्त जाणाऱ्यांचे हाल झाले.
कल्याण बदलापूर राज्यमार्ग हा बदलापूर ते कल्याण तसेच अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडीमार्गे मुंबई, नवी मुंबई आणि महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी महत्वाचा आहे. यात फॉरेस्ट नाक्यावरून सर्वसामान्य वाहतुकीसह औद्योगिक आणि अवजड वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. येथे दोन पंप असून त्यातील एक सीएनजी तर एक पेट्रोल पंप आहे. त्यामुळे या चौकात अनेक वाहनांची गर्दीही असते. येथे एखाद्या बेशिस्त वाहनचालकाने शिस्त मोडल्यास वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका संपूर्ण रस्त्याला आणि शेजारच्या अंबरनाथ काटई रस्त्यालाही बसतो.
गुरूवारी या कल्याण बदलापूर राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. सकाळी दहाच्या सुमारास फॉरेस्ट नाक्यावरून अंबरनाथच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर एचपी पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एका कंपनीत जाणारा ट्रेलर अचानक बंद पडला. ट्रेलर मुख रस्त्यावरून उलटा कंपनीत शिरत होता. त्याचवेळी हा ट्रेलर बंद पडला. बंद पडला त्यावेळी या ट्रेलरचा बहुतांश भाग राज्यमार्गावरील अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गिकेवर होता.
त्यामुळे ट्रेलरने राज्यमार्गाचा बहुतांश भाग व्यापून टाकला. परिणामी येथून वाहने जाण्यासाठी चिंचोळा रस्ता झाला. परिणामी वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा फटका फॉरेस्ट नाक्यावरील वाहतुकीला बसला. ट्रेलर बंद पडण्याच्या ठिकाणापासून अवघ्या ५० मीटरवर सिग्नल आणि चौक असल्याने बदलापूरहून येणाऱ्या वाहनांच्या रांगा थेट चौकातच लागल्या. त्यामुळे अंबरनाथहून टी पॉइंट चौकाकडे तर टी पॉइंटहून बदलापुरकडे जाणारी वाहनेही खोळंबली. सकाळच्या सुमारास झालेल्या या कोंडीमुळे नोकरी, धंद्यासाठी जाणाऱ्यांना फटका बसला.
अवजड वाहनांमुळे कोंडी वाढली
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर अनेक औद्योगिक कंपन्या आहेत. येथे अनेकदा मोठे ट्रेलर, ट्रक वळण घेताना राज्यमार्गावरची वाहतूक प्रभावित करतात. त्याचा फटका सर्वसामान्य वाहतुकीला बसतो. त्यात आता या मार्गावर अनेक वाणिज्य इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे एका कंपनीच्या जागेत २०० ते ४०० कार्यालये उभी राहत आहेत. त्या कार्यालयात येणाऱ्यांच्या वाहनांची मार्गावर भर पडते आहे. त्यामुळे हा मार्ग कोंडीचा मार्ग ठरू लागला आहे.