डोंबिवली : कल्याण शिळफाटा छेद रस्त्यावरील काटई कोळे येथील हाॅटेल कुशाला ग्रीनमधील भागीदारी हिस्सा विक्री प्रकरणात दोन हाॅटेल व्यावसायिकांनी एका हाॅटेल व्यावसायिकाची दीड कोटीची फसवणूक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाॅटेल व्यावसायिक अरविंद आनंद शेट्टी (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हाॅटेल व्यावसायिक नंदकिशोर रुद्राया राय (५७, रा. एमआयडीसी, डोंबिवली), भास्कर पुजारी (मयत, रा. डोंबिवली) भारतीय दंड विधान संहितेच्या कलमाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अरविंद शेट्टी हे मिरा भाईंदर भागात राहतात.
नोव्हेंबर २०१८ मध्ये हा सगळा फसवणुकीचा प्रकार काटई कोळे येथील शिळफाटा रस्त्यालगतच्या हाॅटेल कुशाला ग्रीनमध्ये घडला आहे. तक्रारदार हाॅटेल व्यावसायिक अरविंद शेट्टी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सन २०१८ मध्ये भास्कर पुजारी (मयत) यांनी हाॅटेल कुशाला ग्रीनमधील ५० टक्के हिश्श्यामधील पाच टक्के हिस्सा ५० लाख रूपये किमतीमध्ये मला (अरविंद शेट्टी) विक्री केला आहे. हा व्यवहार माहिती असताना देखील या प्रकरणातील गुन्हा दाखल हाॅटेल व्यावसायिक नंदकिशोर राय यांनी भास्कर पुजारी यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन सन २००५ च्या काळातील काही बनावट कागदपत्रे तयार केली.
या कागदपत्रांवर भास्कर पुजारी यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. आणि या बनावट कागदपत्रांच्या आधारे हाॅटेल कुशाला ग्रीनमधील भास्कर पुजारी यांचा उर्वरित हिस्सा आणि यापूर्वी भास्कर पुजारी यांनी अरविंद शेट्टी यांना विक्री केलेला भागीदारी हिस्सा सन २०१९ मध्ये श्रीकांत देशपांडे, प्रियतम घैसास, अरूण शेट्टी यांना विक्री केला. या विक्री व्यवहाराला अधिकृतता येण्यासाठी या विक्री व्यवहाराचे कागदपत्रे कल्याणमधील सह दुय्यम निबंधक कार्यालय, कल्याण -४ मध्ये ५ मार्च २०१९ मध्ये दस्त नोंदणीकृत केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
हाॅटेल व्यावसायिक नंदकिशोर राय यांना भास्कर पुजारी यांनी हाॅटेल कुशाला ग्रीनमधील त्यांचा पाच टक्के हिस्सा मिरा भाईंदरचे हाॅटेल व्यावसायिक अरविंद शेट्टी यांना विक्री केला आहे. हा व्यवहार दस्त नोंदणीकृत करून पूर्ण करण्यात आला आहे. हे माहिती असताना देखील हाॅटेल व्यावसायिक शेट्टी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने या विक्री व्यवहाराची बाब इतरांपासून लपवून ठेऊन गुन्हा दाखल व्यावसायिकांनी तक्रारदार अरविंद शेट्टी यांच्या हिश्श्यातील यापूर्वी विक्री केलेल्या व्यवहारातील पाच टक्के हिस्सा आजच्या बाजारभावाप्रमाणे विक्री करून हाॅटेल व्यावसायिक अरविंद शेट्टी यांची एक कोटी ५० लाख रूपयांची फसवणूक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कानडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
