डोंबिवली – गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत डोंबिवलीतील तीन महिलांशी वेगवेगळ्या कालावधीत प्रेम संबंध, लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी लगट करणाऱ्या आणि नंतर त्या महिलांची फसवणूक करून त्यांना सोडून देणाऱ्या एका शिक्षकाला मानपाडा पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीवरून अटक केली आहे. त्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयान पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुल तिवारी असे या शिक्षकाचे नाव आहे. ते उल्हासनगर मधील एका नामवंत शाळेत शिक्षक आहेत. पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की सन २०११ पासून राहुल तिवारी हे शिक्षक महिलांना प्रेमसंबंधातून आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांच्या बरोबर लग्नाचे, प्रेमाचे आमिष दाखवून राहत होते.
डोंबिवलीतील एका शिक्षिकेबरोबर राहुल तिवारी यांचे चौदा वर्षापासून प्रेमसंबंध होते. ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यांना एक मूल झाले. काही दिवसांनी राहुल आणि संबंधित महिलेचे वाद सुरू झाले. त्यानंतर राहुल तिवारी यांनी त्या महिलेशी असलेले संबंध तोडून टाकले. यासंदर्भात पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता.
शिक्षकेबरोबर प्रेमसंबंध तोडल्यानंतर राहुल तिवारी यांनी अन्य एका तरुणीबरोबर विवाह केला. त्या तरुणीबरोबर राहुलचे पटले नाही. पतीकडून शारीरिक मानसिक त्रास होतो म्हणून त्या तरुणीने माहेरी जाणे पसंत केले. या प्रकारानंतर राहुल यांनी अन्य एका महिलेबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. तिला जाळ्यात ओढून तिच्याबरोबर काही दिवस नातेसंबंध टिकवून ठेवले.परंतु, या तिसऱ्या महिलेबरोबरही राहुल तिवारी यांचे खटके उडू लागले. त्यानंतर राहुल यांनी पहिल्या दोन घटनांप्रमाणे तिसऱ्या महिलेशी काडीमोड घेतला, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
राहुल तिवारी हे शिक्षक असूनही त्यांनी अशी कृत्ये केल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. राहुल यांची अधिक चौकशी करायची असल्याने पोलिसांनी कल्याण जिल्हा न्यायालयाला सांगितले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. अशाच प्रकारे राहुल तिवारी यांनी आणखी काही महिलांना फसविले आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत. विद्यार्थ्यांची घडण करण्याचे काम शिक्षकाचे असते. त्या शिक्षकाकडून असे कृत्य गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.