डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील वाहतूक पोलीस कार्यालया समोरील एका रुग्णालयात लाकडी खोक्यात बंदिस्त ठेवण्यात आलेली चार लाख रूपये किमतीची सोनोग्राफीची मशिन अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. यासंदर्भात एका डाॅक्टरने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा चोरीचा प्रकार डोंबिवली पूर्वेतील वाहतूक पोलीस कार्यालया समोरील सुमती निवासच्या पहिल्या माळ्यावरील कक्षात घडली आहे. या चोरीप्रकरणी डाॅ. प्रीतिश श्रीकांत भावसार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुध्द तक्रार केली आहे. दिवसाढवळ्या दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.
डाॅ. प्रीतिश भावसार यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सुमती निवासमधील पहिल्या माळ्यावरील एका कक्षात रुग्ण तपासणीची चार लाख रूपये किमतीची सोनोग्राफी मशिन एका लाखडी खोक्यात बंदिस्त करून ठेवली होती. मे. होन्डा इलेक्ट्राॅनिक्स कंपनीची ही करड्या रंगाची सोनोग्राफी मशिन आहे. सोनोग्राफी मशिन ठेवलेल्या खोलीचा मुख्य दरवाजा कुलुपू लावून बंदिस्त होता. तरीही अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या खोलीत प्रवेश केला. आणि कोणालाही सुगावा लागणार नाही अशा पध्दतीने ही मशिन चोरून नेली आहे.
आतापर्यंत डोंबिवलीत घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार, रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहने चोरून नेण्याचे प्रकार घडत होते. पण आता रुग्णालयांच्या खोल्यांमधील रुग्ण सेवेच्या मशिनी चोरटे चोरायला लागल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. माहितगार इसमाने ही चोरी केली असण्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणाची डाॅ. भावसार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर साहय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक जगताप या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
विशेष म्हणजे चोरी झालेले सुमती निवास आणि रामनगर पोलीस ठाणे यांच्यात हाकेचे अंतर आहे. पोलीस ठाण्याच्या जवळील इमारतीत दिवसाढवळ्या चोरट्याने ही चोरी केली आहे. पोलिसांनी या इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या गुन्हे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गेल्या आठवड्यात खोणी पलावा वसाहतीमधील एका डाॅक्टरच्या मोटारीच्या मागील भागाची काच फोडून कल्याणमध्ये चोरट्यांनी महत्वाची कागदपत्रे आणि एक टॅब चोरून नेला आहे. ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीत डाॅक्टरच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन चोरीला गेली आहे.