ठाणे / अंबरनाथ – नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून याची प्रक्रिया राबविली जाते. मात्र कल्याण तालुक्यातील उंबार्ली गाव ऑनलाईन प्रणालीतच दिसत नसल्याने येथील सर्व शेतकऱ्यांना यंदा पीक विमा भरण्यासाठी मुकावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे.
अतिवृष्टी, अनियमित पावसाचे सत्र, तसेच पिकांवर होणारे रोग-कीड आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे मोठा आर्थिक फटका बसत असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली. दरवर्षी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते आणि हंगामात नुकसान झाल्यास विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाते. यंदाही कल्याण तालुक्यातील अनेक गावांत कृषी विभागाने या योजनेबाबत जनजागृती केली होती. ग्रामपंचायत पातळीवर तसेच सीएससी द्वारे शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या नोंदी, आधार व बँक खात्याची माहिती घेऊन सीएससी केंद्रात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र उंबार्ली गावाचे नावच ऑनलाईन पोर्टलवर दिसत नसल्याने शेकडो शेतकरी परत फिरले.
खरीप हंगामासाठी प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, तालुक्याच्या यादीत उंबार्लीचा समावेशच न झाल्याने गावातील कुठल्याही शेतकऱ्याला या योजनेत नोंदणी करता आली नाही. शेतकरी प्रतिनिधींनी वेळोवेळी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून समस्या मांडली, पण पोर्टलवरील त्रुटी दूर न झाल्याने प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यंदा शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या क्षेत्रानुसार विमा प्रीमियम भरायचा होता. धान, भाजीपाला, फळबागा यासारखी पिके घेणारे शेतकरी विशेषतः उत्सुक होते. परंतु नाव नोंदणीची संधी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिक वाढला आहे. “आम्ही सर्व कागदपत्रे तयार ठेवली होती, पण गावच यादीत नाही, यासाठी आमचा काय दोष?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, स्थानिक प्रशासनाने वेळेत लक्ष दिले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. आगामी हंगामात अशा प्रकारचा अन्याय पुन्हा होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
” आम्ही पीक विमा भरण्यासाठी प्रयत्न केले होते. आम्ही सीएससी सेंटरमध्ये फेऱ्या मारल्या. मात्र तिथे ऑनलाईन प्रणालीत गावाचे नाव येत नसल्याने पीक विमा भरू शकलो नाही. “ – गजानन भोईर, शेतकरी
” उंबार्ली गावातील शेतकऱ्यांनी आमच्याकडे अनेकदा येऊन पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावाचे नाव ऑनलाईन प्रणालीत दिसून न आल्याने गावातील शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. ” – शंकर यादव , सीएससी सेंटर चालक