Thane Traffic News : ठाणे- गायमुख घाट चढणीला दोन ट्रक बंद पडले. त्यात, मिरा-भाईंदर हद्दीतून विरुद्ध दिशेने सोडण्यात येणारी वाहने आणि खड्डे यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरु असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कासारवडवली, गायमुख ते फाऊंटेन हॉटेल आणि मिरा-भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली असून नागरिक हैराण झाले आहेत.
ठाणे शहरात विविध प्रकल्पांची सुरु असलेली कामे, खड्डे यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज होणाऱ्या कोंडीमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच, गुरुवारी सकाळपासून घोडबंदर मार्ग पुन्हा कोंडीत अडकल्याचे चित्र आहे.
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मर्गावर गायमुख घाट चढणीजवळ दोन अवजड वाहने ऐन सकाळच्या सुमारास बंद पडली. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तर, दुसरीकडे मिराभाईंदर हद्दीतील काशिमिरा येथून वाहतूक विरुद्ध दिशेने सोडली जात आहेत. याचा, फटका संपूर्ण घोडबंदर मर्गावर बसल्याचे पाहायला मिळत आहे.
कासारवडवली, गायमुख घाट ते फाऊंटन हॉटेल आणि मिरा भाईंदर येथील नवघरपर्यंत मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ही कोंडी झाली आहे. तसेच गायमुख घाट चढणीला बंद पडलेले वाहन बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. परंतु, या वाहतूक कोंडीमुळे दहा ते पंधरा मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. ऐन सकाळच्या सुमारास ही कोंडी झाल्यामुळे नोकरीसाठी निघालेल्या नोकरदार वर्गाला याचा प्रचंड फटका बसला असून त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.