डोंबिवली : मागील दोन वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे डोंबिवलीचे आमदार, जिल्हाध्यक्ष यांना विविध कारणांवरून वेठीस धरणारे, किरकोळ कारणांवरून कुरबुऱ्या काढून भाजपचा राजीनामा देणारे भाजपचे डोंबिवली पश्चिमेतील माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सपत्नीक रविवारी रात्री शिंदे शिवसेनेत ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

विकास म्हात्रे यांचे सततचे राजीनामा सत्र, ‘विशिष्ट’ कारणांसाठी पालिका आयुक्तांना संपर्क करण्यास सांगून प्रभागातील विशिष्ट कामाकडे लक्ष देण्याची मागणी म्हात्रे यांच्याकडून भाजपच्या डोंबिवलीतील ज्येष्ठ नेत्यांकडे केली जात होती. प्रत्येक वेळी पालिका आयुक्तांना संपर्क करून त्या विशिष्ट कामांकडे लक्ष न देण्यासाठी सांगताना भाजप नेत्यांची कोंडी होत होती. गरीबाचापाडा, राजूनगर हे दोन हक्काचे प्रभाग भाजपकडे विकास म्हात्रे यांच्या निमित्ताने आहेत. त्यामुळे भाजप विकास म्हात्रे यांना न दुखावता त्यांचे लाड करत होती.

बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभारखाणपाडा, गरीबाचापाडा भागात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आमदार निधी, शासकीय निधीतून सुमारे ५२ कोटीची विकास कामे विकास म्हात्रे यांच्या प्रभागात करण्यात आली आहेत. डोंबिवलीत इतर कोणाच्या प्रभागात नाहीत असे गुळगुळीत काँक्रीट रस्ते विकास म्हात्रे यांच्या प्रभागात करण्यात आले आहेत, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विकास म्हात्रे यांना भाजपने मानाची पदे आणि पक्षात ज्येष्ठत्वाचा मान दिला. गेल्या दीड वर्षापासून विकास म्हात्रे भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांवर फुरगटून होते. आपल्या प्रभागाकडे या नेत्यांचे लक्ष नाही. आपल्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. या नाराजीमुळे विकास म्हात्रे यांनी राजूनगरमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयातील, जनसंपर्क कार्यालया बाहेरील भाजपचे कमळ चिन्ह, भाजप नेत्यांच्या प्रतिमा काढून टाकल्या होत्या. जाहीर शुभेच्छा फलकावर ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह न वापरता फलकबाजी करत होते.

डोंबिवली पश्चिमेत बेकायदा बांधकामांचे विषय ऐरणीवर आले आहेत. काही खमके तक्रारदार हे विषय ईडीसारख्या तपास यंत्रणांकडे घेऊन गेले आहेत. काही जण मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या सगळ्या प्रकरणात आपणास साथ कोण देईल असाही विचार काही राजकीय मंडळी करत आहेत. त्यामधून अयाराम गयारामांचे पक्ष प्रवेश सुरू असल्याची चर्चा आहे.

तीन महिन्यापूर्वी विकास म्हात्रे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यावर त्यांची समजूत जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रदीप जोशी यांनी काढली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रेंचे सांत्वन केले. म्हात्रे यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर विकास म्हात्रे यांची भेट घडवून आणली. छायाचित्र काढण्यात आली. ती प्रसारित करण्यात आली. आता आपण भाजपमध्ये समाधानी आहोत, असा शब्द देऊन विकास म्हात्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निघाले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या शब्दाची जाण न ठेवता विकास म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे.