ठाणे : मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी वाड्मय वाचवण्यासाठी आपणच पुढे यायला हवे. एका वर्गात एक मुलगा असला तरी त्याला मराठी शिकवलीच पाहिजे. कारण याच मुलामधून उद्या एखादा तुकाराम किंवा ज्ञानेश्वर जन्म घेईल, असे साहित्यिक व ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्यावतीने शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष साहित्यिक विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी व गीतकार प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दिक्षित हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, मला दोन गोष्टींचा प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो. एक म्हणजे माझा महाराष्ट्रात जन्म झाला आहे आणि दुसर माझी मातृभाषा मराठी आहे. तसेच जगाचा विचार केला तर भारतातील राज्याच्या नावातच राष्ट्र आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रात एवढी कर्तबगार व्यक्ती जन्माला आली आहेत. तेवढ्या उंचीची शिखरे हिमालयात देखील नाहीत असे ते म्हणाले.त्याचप्रमाणे महाराष्ट्र ही अशी भूमी आहे जिथे टिळक, आंबेडकर, सावरकर, फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, आचार्य अत्रे अशी थोर व्यक्तिमत्वे जन्माला आली. एवढ्या विद्वानांची परंपरा इतर कोणत्याही प्रांतात नाही, असे पाटील म्हणाले.
मराठी सारखी दुसरी कुठली भाषा नाही कारण मराठी भाषेत ज्ञानोबा आणि तुकोबा या दोघांच्या उंचीची शिखरे निर्माण झाली आहेत. म्हणून मला मराठीच खूप कौतुक वाटत. त्यानिमित्त मला अध्यक्षपद मिळतंय याचा आनंद आहे असे देखील त्यांनी सांगितले.माय मराठी ही आपण जपली पाहिजे. गरजेपोटी मला काही ऐतिहासिक विषय लिहावे लागले. कारण की इतिहास कसा वाचावा, कसा ऐकवावा आणि साठवावा हेच लोक विसरून गेले होते. मला खरतर इतिहास ग्रंथ पाहिजे होते. पण नंतर लक्षात आलं इतिहास ग्रंथ लिहिले तर ते फक्त ग्रंथालयाच्या कपाटात धन होईल, लोकांपर्यंत पोहचणार नाही असे ते म्हणाले.
राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वांच्या आठवणी सांगताना पाटील म्हणाले, यशवंतरावांनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या एवढा वाचणारा नेता मी पाहिलेला नाही. ते दररोज किमान १४ वर्तमानपत्रे वाचत असत. मोठ्या व्यक्तींच्या सहवासामुळे माझी भाषा, दृष्टीकोन आणि जीवनाचा विचार विस्तारला.सगळी मोठी माणसं मला अनुभवायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या सहवासामध्ये माझी भाषा सुधारली. जीवनाविषयी दृष्टीकोण मला मिळत गेला. वयाच्या ३५ पर्यंत मी किती महान लोकांच्या सहवासात आलो. मला माझ्या उत्तरार्धात जेवढी कटकटीची माणसं भेटली. त्यापेक्षा चंद्र सूर्य सारखी विशाल माणसं मला आधी भेटलीत असे देखील त्यांनी सांगितले.मराठी संस्कृती आणि मराठी भाषा सध्या संकटात आहे. तिचा बचाव आपण केला पाहिजे. माझ्या अध्यक्षपदावेळी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि बाजाराच्या गावी एक मराठी भुवन झालं पाहिजे असा आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले