Thane Biggest Mall Sold: ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील तरुणाच्या पसंतीचे आणि शाॅपिंगसाठी आवडीचे ‘विवियाना माॅल’ आता ‘लेक शोअ” माॅल म्हणून ओळखले जाणार आहे. यासंदर्भाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमावर ‘विवियाना’चे ‘लेक शोअर’ हे नाव होणार असल्याचे संदेश प्रसारित होत होते. त्यामुळे आता विवायाना नाही तर लेक शोअर माॅल म्हणावे लागणार आहे.
ठाण्यात २०१३ साली सुरू झालेल्या विवियाना मॉलचा विकास अश्विन शेट ग्रुप यांनी केला होता, तर नंतर त्यात सिंगापूरच्या सार्वभौम निधी (जीआयसी) यांचीही भागीदारी झाली. सुमारे १० लाख चौरस फूट व्यापणाऱ्या या मॉलमध्ये २५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची दुकाने, मोठा फूड कोर्ट, अत्याधुनिक मल्टीप्लेक्स, तसेच एंटरटेनमेंट झोन्स आहेत. टाटा स्टारबझारचे हायपरमार्केट आणि अनेक प्रीमियम फॅशन ब्रँड्समुळे हा मॉल ठाणे, मुलुंड, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या भागांतील ग्राहकांसाठी प्रमुख शॉपिंग हब ठरला. शॉपिंगसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सामाजिक उपक्रमांमुळे विवियाना मॉलने स्थानिक समाजाशी घट्ट नाते जोडले. शॉपिंगच नाही तर, अनेक कुटूंब किंवा मित्र परिवार या मॉल मध्ये फिरण्यासाठी देखील येतात. २०२२ मध्ये या माॅलचा विक्री व्यवहार पार पडला होता. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या पाठबळावर लेक शोअर इंडिया ॲडव्हायजरीने हा मॉल १,९०० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. या माॅलचे नाव आता लेक शोअर करण्यात आले आहे.
भारतातील काही प्रमुख रिटेल आणि मनोरंजन ब्रँडना स्थान देणारा विवियाना मॉल हा गेल्या दशकभराहून अधिक काळ, ठाण्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. दरवर्षी लाखो लोक माॅलला भेट देतात. त्याच्या रीब्रँडिंगसह, हे सेंटर शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाणांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करेल, तसेच भविष्यासाठीच्या कंपनीच्या व्यापक दृष्टिकोनाशी अधिक जोडले जाईल. “विवियाना हे केवळ एक शॉपिंग सेंटर नाही, तर ते त्यापेक्षाही जास्त आहे. ते एक असे ठिकाण आहे जिथे खरेदी करण्यासाठी असो, खाण्यासाठी असो किंवा फक्त मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी असो, अनेक लोक एकत्र येतात,” असे लेक शोअर इंडियाचे एमडी आणि सीईओ अश्विन पुरी म्हणाले.
लेक शोअर ठाणे म्हणून आम्ही हाच वारसा पुढे चालवू. प्रेरणा देणारे, शहराला परस्परांशी जोडणारे आणि सातत्याने वाढणारे संस्मरणीय अनुभव निर्माण करत राहू.” पुरी पुढे म्हणाले, “हे रीब्रँडिंग म्हणजे केवळ नाव बदलणे नाही तर ते एक धोरणात्मक पाऊल आहे. ठाणे आणि भारताच्या शहरी रिटेल लँडस्केपला आकार देण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. आम्ही आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत असतानाच गुणवत्तेसाठी आणि नावीन्यपूर्णतेसाठी एक बेंचमार्क म्हणून लेक शोअर ठाणे ओळखले जाईल.” करार, सेवा किंवा दैनंदिन कामकाजात कोणताही बदल न होता किरकोळ विक्रेते, भागीदार आणि ग्राहकांसाठी हा बदल सर्वसमावेशक असेल. मालकी आणि व्यवस्थापनात काहीही बदल झाला नसला तरी सातत्य, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेवर लेक शोअरचे लक्ष असेल, असेही लेक शोअर कडून स्पष्ट करण्यात आले.