ठाणे – जिल्हा प्रशासनाने महसूल विभागातील सेवा अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी ‘सेवा पंधरवडा’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणारा हा उपक्रम महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राज्यभर राबवला जाणार असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांना तत्काळ दिलासा देणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी या काळात विविध योजना युद्धपातळीवर अंमलात आणल्या जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शासकीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अंतर्गत सर्वत्र स्थानिक प्रशासनाकडून सेवा पंधरवडा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचे तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. पहिला टप्पा हा पाणंद रस्ते मोहीम बाबत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल ने-आण सुलभ करण्यासाठी पाणंद (शिवार) रस्त्यांची नोंदणी, क्रमांक देणे आणि नकाशांवर चिन्हांकन केले जाईल. रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी ‘रस्ता अदालत’ आयोजित केली जाणार असून, शेतावर पोहोचण्यासाठी आवश्यक संमतीपत्रेही या काळात पूर्ण केली जातील.
दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ यामध्ये गरजू नागरिकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी शासकीय जमिनींचे कब्जेहक्काने वाटप, तसेच रहिवासी जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमन या कालावधीत करण्यात येईल. यासाठी ग्रामविकास, नगरविकास व महसूल विभागांच्या शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. तर तिसरा टप्पा हा नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत असणार आहे. या टप्प्यात जिल्हाधिकारी स्थानिक गरजांनुसार नागरिकाभिमुख योजना सादर करतील.
या मोहिमेसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी सर्व यंत्रणांसह सविस्तर नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायतींना या मोहिमेत सक्रिय सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. ठाणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन या मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.