ठाणे : ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी महायुतीचा मेळावा पार पडला आणि मेळाव्यात बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाण्याचा उमेदवार कोण असेल, याबाबत सूचक विधान केले आहे. मेळाव्याच्या व्यासपीठावर बसलेल्या इच्छुकांपैकी एक जण उमेदवार आहे आणि तो भरघोस मतांनी निवडून येईल, असे केसरकर यांनी सांगितले. व्यासपीठावर शिवसेनेचे रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपचे संजीव नाईक या इच्छुकांसह शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे हे उपस्थित होते. त्यामुळे यापैकी एक जण उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत. यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसून या जागेवर कोण उमेदवार असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. महायुतीच्या या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नसेल तरी युतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. ठाणे आणि मीरा- भाईंदर शहरात मेळावा पार पडल्यानंतर घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात युतीचा तिसरा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?
महायुतीचा उमेदवार कोण असेल याविषयी दररोज वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. यापैकी एकही नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. असे असतानाच शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात पार पडलेल्या महायुतीचा मेळाव्यात बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाण्याचा उमेदवार कोण असेल, याबाबत सूचक विधान केले आहे. मेळाव्याच्या व्यासपीठावर बसलेल्या इच्छुकांपैकी एक जण उमेदवार आहे आणि तो भरघोस मतांनी निवडून येईल, असे केसरकर यांनी सांगितले. व्यासपीठावर शिवसेनेचे रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपचे संजीव नाईक या इच्छुकांसह शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे हे उपस्थित होते. त्यामुळे यापैकी एक जण उमेदवार असणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यातून ४८ पैकी ४५ खासदार निवडून आणू असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला आहे. यामुळे आपण राज्यातून ४५ खासदार निवडून द्यायला हवेत आणि त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाणे जिल्हा आघाडीवर असायला हवा, असे केसरकर म्हणाले. आपल्याकडे इच्छुक उमेदवार खूपच आहेत. पण, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की पंतप्रधान मोदी यांना ताकद द्यायची आणि त्याच्यासाठीच ही लढाई आहे. ही लढाई तुम्ही आम्ही मिळून जिंकून दाखवू, असे केसरकर म्हणाले.