लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे हरखून गेलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतून यंदाची नगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांच्या अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. अंबरनाथमध्ये भाजपची ताकद फारशी नाही, असे असताना विधानसभा निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवाराचा अगदी थोडक्या मतांनी पराभव झाला. यामुळे शहरात भाजपची ताकद वाढल्याचा साक्षात्कार या पक्षातील कार्यकर्त्यांना झाला असून, त्यामुळे या पक्षातून इच्छुकांची संख्या कधी नव्हे इतकी वाढली आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे कार्यक्रम घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या मुलाखती पार पडल्या असून भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अजून सुरूच आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या कार्यक्रमात शिवसेनेने आघाडी घेतली असली, तरी भाजपमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांचा आकडा पाहून येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेने अंबरनाथमधील ५७ प्रभागांसाठी तब्बल २३५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढीस लागल्या असून अनेकांना नगरसेवकपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे एकाच प्रभागात पक्षाकडून दहापेक्षा अधिक इच्छुक असल्याचे दिसून आले आहे.
२३५ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याने बंडखोरी रोखताना शिवसेना नेत्यांच्या नाकीनऊ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा नेतृत्वावर विश्वास असून त्यांच्या आदेशानुसार बंडखोरी टळेल असा विश्वास स्थानिक नेते व अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या येथील कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहचला आहे. त्यामुळे भाजपकडेसुद्धा इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने कधी नव्हे ते भाजपच्या मुलाखती दोन दिवसांपासून सुरू आहेत.
आतापर्यंत १०० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून, दिवसभरात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युती नाही..
महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती व्हावी यासाठी वरिष्ठ नेते एकीकडे प्रयत्नशील असले, तरी स्थानिक नेत्यांनी मात्र युतीचा पर्याय धुडकावून लावल्याची माहिती भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष विजय खरे यांनी दिली. यासंबंधी कार्यकर्त्यांचे मत वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले आहे, असेही खरे यांनी स्पष्ट केले. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची निवडणूक स्वबळावर लढवायला हवी, अशा भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान युतीचा निर्णय वरिष्ठच घेतील असे शिवसेनेच्या सुनील चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. अंबरनाथमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्यास शिवसेना सक्षम असली, तरी आम्ही वरिष्ठांचे आदेश मानणाऱ्यांपैकी आहोत. त्यामुळे राज्य पातळीवर सुरू असलेल्या युतीसंबंधीच्या घडामोडींचा आम्ही आदर करतो, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winning candidate queues in bjp for municipal election