अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील कै. छाया रुग्णालय, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची जागा यासह शेतकी सोसायटीचे निर्माते, शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी नगरसेवक, समाजसेवक आणि “अंबरनाथ भूषण” सन्मानाचे मानकरी यशवंत महादेव उर्फ य. मा. चव्हाण यांच्या स्मारकाची योग्य पुनर्स्थापना व्हावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा अंबरनाथ नगरपालिकेकडे केली आहे.
य. मा. चव्हाण यांच्या कार्याचा गौरव म्हणून पूर्वी अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खुले नाट्यगृह त्यांच्याच नावाने ओळखले जात होते. “य. मा. चव्हाण खुले नाट्यगृह” अशी त्या ठिकाणाची ओळख होती. या नाट्यगृहाच्या रंगमंचाच्या एका बाजूस त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. मात्र काही वर्षांपूर्वी नाट्यगृह पाडून त्या ठिकाणी पार्किंग प्रकल्प उभारण्यात आल्याने हा पुतळा विस्थापित झाला. त्यानंतर पुतळा पालिकेच्या ताब्यात असला तरी त्याची योग्य पुनर्स्थापना अद्याप झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर य. मा. चव्हाण यांचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, सध्या नगरपालिकेच्या अनेक वास्तू जसे की नवे प्रशासकीय भवन, नाट्यगृह, ग्रंथालय आणि अभ्यासिका बांधून सज्ज आहेत. या नव्या वास्तूंमध्ये कुठेतरी योग्य ठिकाणी य. मा. चव्हाण यांच्या अर्धपुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात यावी.
समाजकार्याचा ठसा
१९४८ साली यशवंतराव महादेव चव्हाण यांनी “अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी मर्यादित” या संस्थेची स्थापना केली. त्या काळात अंबरनाथ येथील सर्व्हे नंबर १६६ मधील २०० एकर ओसाड वनक्षेत्र त्यांनी शेतकी सोसायटीच्या माध्यमातून वाचवले. त्यामुळे आजही अंबरनाथ पूर्व विभागात मोठा हिरवा पट्टा टिकून आहे. तत्कालीन कृषीमंत्री बाळासाहेब सावंत यांची त्यांना मोलाची साथ मिळाली होती.
तसेच अंबरनाथ नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा पालिकेला मिळवून देण्यातही य. मा. चव्हाण यांची भूमिका निर्णायक होती. त्या प्रयत्नांमुळेच कल्याण–बदलापूर रस्त्यालगत सध्याची पालिका इमारत उभी राहू शकली.
नगरसेवक ते सभापतीपर्यंत प्रवास
१९५७ मध्ये कोहोज–खुंटवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सार्वजनिक जीवनात प्रवेश करून, १९६२ आणि १९६७ मध्ये अंबरनाथ नगर पालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यांनी पालिकेतील विविध विषय समित्यांवर काम करताना अनेक विकासकामे हाती घेतली. त्यांच्या पुढाकारानेच डॉ. बी. जी. छाया रुग्णालय सुरू करण्यात आले, जे आज शासनाच्या ताब्यातील उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखले जाते.
सन्मानाची अपेक्षा
अंबरनाथ शहराच्या विकासात मोलाची कामगिरी करणाऱ्या या थोर व्यक्तीचे स्मारक आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळावा, यासाठी त्यांच्या अर्धपुतळ्याची योग्य ठिकाणी पुर्नस्थापना व्हावी, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. अंबरनाथच्या विकासाच्या इतिहासात य. मा. चव्हाण यांचे नाव आदराने घेतले जाते. आता त्यांच्या स्मारकाला योग्य जागा आणि सन्मान मिळण्याची शहरवासीयांनाही प्रतीक्षा आहे.