Rahul Gandhi Will Give 5 Thousand Crore Loan To Pakistan Without Interest : लोकसभा निवडणूक २०२४ आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्ष शेवटच्या टप्प्याच्या तयारीत व्यस्त आहेत. या निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात राहुल गांधींनी काँग्रेस सत्तेवर आल्यास पाकिस्तानला ५० वर्षांसाठी बिनव्याजी पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल, अशी घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे; ज्यावरून आता मोठे राजकारण सुरू झालेय. पण, यासंदर्भात फॅक्ट क्रेसेंडोने केलेल्या तपासात एक वेगळेच सत्य समोर आले आहे. राहुल गांधी खरोखरच असं म्हणाले का? असेल तर ते असे का म्हणाले, याबाबत सविस्तर आढावा नक्की वाचा…

काय होत आहे व्हायरल?

काँग्रेस सत्तेत आल्यावर पाकिस्तानला ५० वर्षांसाठी बिनव्याजी पाच हजार कोटींचे कर्ज दिले जाईल अशी राहुल गांधींनी घोषणी केली, या दाव्यासह एबीपी न्यूजच्या बातमीचे ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल पोस्टमध्ये एबीपी न्यूजचा लोगो आणि बातमीचे ग्राफिक दिसते. बातमीमध्ये राहुल गांधी नावाबरोबर दोन घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत.

१) पाकिस्तानला मदत करणे आवश्यक आहे आणि आम्ही ती नक्कीच करू.

२) आमचे सरकार बनताच आम्ही पाकिस्तानला ५० वर्षांसाठी पाच हजार कोटींचे कर्ज बिनव्याजी देऊ.

युजर्सने हे ग्राफिक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काँग्रेसचे सरकार आले तर पाकिस्तानला ५० वर्षांसाठी पाच हजार कोटी रुपये बिनव्याजी दिले जाईल – राहुल गांधी.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तपास:

या व्हायरल दाव्याची तपासणी करताना सर्वप्रथम एबीपी न्यूजच्या वेबसाइटवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे ग्राफिक आढळले नाही.

या उलट एबीपी न्यूजने १२ नोव्हेंबर २०१८ रोजी ट्विटद्वारे स्पष्ट केले होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक फेक असून अशी बातमी एबीपी न्यूजकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ऑनलाइन प्रसारित केले जाणारे संलग्न माध्यम आमच्या चॅनेलच्या टेम्पलेटशी जोडलेले आहे. राहुल गांधींच्या विधानांचे वृत्त एबीपीने प्रसिद्ध केलेले नाही, हे वृत एबीपी न्यूज नेटवर्कशी संबंधित नाही.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक्स फेक असून अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने प्रसिद्ध केलेली नाही. एबीपी न्यूजने २०१८ मध्येच स्पष्ट केले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यावर राहुल गांधी पाकिस्तानला ५० वर्षांसाठी बिनव्याजी पाच हजार कोटींचे कर्ज देतील अशी कोणतीही बातमी एबीपी न्यूजने जाहीर केलेली नाही. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक अनेक वर्षांपासून व्हायरल होत आहे.

अनुवाद – अंकिता देशकर

(ही कथा मूळतः फॅक्ट क्रेसेंडॉने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)