वर्षानुवर्षे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपण अनेकदा ऐकतो आणि तरीही अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठी निर्दयी माणसं प्राण्यांचा गैरवापर करतात आणि काही विकृत लोकं तर हद्दच पार करतात. सध्या असाच धक्कादायक प्रकार बोरिवलीमध्ये घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील बोरिवली रेल्वेस्थानकावरील स्कायवॉकवर रात्री उशिरा एका भटक्या श्वानाबरोबर एक तरुण अश्लील कृत्य करतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपीचे हे क्रूर कृत्य व्हिडीओमध्ये कैद झाले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्कायवॉकवर हा तरुण क्रूर कृत्य करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

FPJने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (२९ जानेवारी) बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवर ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, एक माणूस पुलावरून रेकॉर्डिंग करत असताना चालत असतो आणि अचानक त्याला स्कायवॉकवर एका भटक्या श्वानावर लैंगिक अत्याचार करणारा एक माणूस दिसतो. त्याला बघताच तो माणूस तरुणाला विचारतो, “काय करतोयस?”

माणसाला व्हिडीओ रेकॉर्ड करताना बघून आणि वारंवार प्रश्न विचारताना बघून आरोपी तरुण तिथून निघून जातो. व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करत त्याच्या वाईट कृत्याबद्दल त्याला विचारत असते, पण काहीच उत्तर न देता तो तरुण चालत राहतो.

व्हायरल व्हिडीओ

हा धक्कादायक व्हिडीओ @streetdogsofbombay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “२९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३ च्या सुमारास मुंबईच्या बोरिवली स्थानकाच्या फ्लायओव्हरजवळ प्राण्याबरोबर क्रूरतेची हृदयद्रावक घटना घडली, जिथे एका असहाय्य श्वानावर अकल्पनीय अत्याचार करण्यात आले. अशा क्रूरतेला आपल्या समाजात स्थान नाही आणि आपण दोषीला जबाबदार धरले पाहिजे,” अशी कॅप्शन दिली आहे.

तसंच पोस्टमध्ये, “आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे! या घटनेबाबत काही माहिती असल्यास पुढे या. एकत्रितपणे आपण प्राण्यांच्या अत्याचाराविरुद्ध उभे राहू शकतो आणि सर्व प्राण्यांसाठी आणि सुरक्षित जगासाठी कार्य करू शकतो. जागरूकता पसरवा आणि न्याय मिळेल याची खात्री करण्यात मदत करा! आपल्याकडे काही माहिती असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा”, असंही पुढे लिहिण्यात आलं आहे.

निष्पाप प्राण्याला न्याय देण्याची मागणी करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. निष्पाप प्राण्यासोबत अशोभनीय कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमी व कार्यकर्त्यांकडून होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai borivali young man assaulted stray dog on skywalk at borivali railway station shocking video viral dvr