Hindi-Marathi Language Row In Mumbai Local Train Video : राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच पेटलयं. रोज याबाबतच्या नव-नवीन घटना समोर येताना दिसतात. आता या भाषिक वादाचे पडसाद मुंबई लोकल ट्रेनमध्येही पाहायला मिळतायत. यात नवी मुंबई लोकल ट्रेनमधील दोन महिलांमधील मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून झालेल्या वादाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय, ज्यात महिला एकमेकांशी हिंदी- मराठी भाषेवरून मोठमोठ्याने वाद घातलताना दिसतायत. एक महिला समोर बसलेल्या तरुणीला मी मराठीतच बोलणार, कारण मी माझ्या महाराष्ट्रात आहे असे म्हणताना ऐकू येतेय.
व्हिडीओमध्ये एक मराठी महिला आक्रमकपणे दुसऱ्या महिलेला मराठी बोल असे सांगताना दिसतेय, ज्यावर हिंदी बोलणारी महिला उत्तर देते की, मी मराठी बोलायची की नाही हा माझा निर्णय आहे. कुठे लिहिलं आहे का मराठी बोलायचं असे म्हणताना ऐकू येतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार नवी मुंबई येथील लोकल ट्रेनमध्ये घडल्याची महिती समोर येत आहे.
“मराठी नाही बोलता येत तर ठेवणार नाही तुला महाराष्ट्रात, समजलं का?”
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एका मराठी महिलेने एका हातात चिमुकलीला घेतले आहे तर दुसऱ्या हाताने व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतेय. यात सुरुवातीला ती समोर बसलेल्या परप्रांतीय तरुणीला म्हणते की, आता तुझा आवाज बंद झाला का? मी मराठीत बोलते, कारण महाराष्ट्रात आहे माझ्या. यावर ती परप्रांतीय महिला मुजोरपणे उत्तर देते की, मग काय करू मी, हे कुठे लिहिले आहे? माझा जन्मपण इथेच झालाय, समजलं ना.. मराठी येणं गरजेचं नाही… यावर मराठी महिला परप्रांतीय महिलेला म्हणते की, तू महाराष्ट्रात राहतेस मग मराठीतच बोल चल.., मराठी नाही बोलता येत तर ठेवणार नाही तुला महाराष्ट्रात, समजलं का? यावर परप्रांतीय तरुणी उत्तर देते की, तू कोण लागून गेलीस? ज्यावर मराठी महिला उत्तर देते की, मी महाराष्ट्राची मुलगी आहे, काय करणार तू, मराठी बोल ना मग… दरम्यान, हा वाद काहीवेळ असाच सुरू राहतो. पण, परप्रांतीय महिलने मराठी बोलण्यास नकार दिल्याने या भाषिक वादाला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं तर मराठी बोलता यायलाच पाहिजे यासाठी आता मराठी भाषिक जागोजागी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. लोकल ट्रेनमधील भाषिक वादाचा हा व्हिडीओ एक्सवर
@Babymishra_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आत्तापर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, ‘प्रत्येक जण मतांचे राजकारण करतायत, ते आपल्याला मूर्ख बनवतात आणि स्वतःचे हित साधतात.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ते आपल्याला आपापसात भांडायला भाग पाडत आहेत.’