Mumbai Rains Local Train Running: मुंबई म्हणजे जणू धावती नगरी. या शहराला कधीही पाऊस हरवू शकला नाही, उलट पावसातच मुंबईचं खरं रूप दिसतं. गेले तीन दिवस मुसळधार पावसानं संपूर्ण मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. रस्ते जलमय झाले, वाहतूक ठप्प झाली, बस-टॅक्सीच्या चाकांना जणू ब्रेक लागला. अशा स्थितीत सामान्य माणसाला ऑफिसला पोहोचणं म्हणजे मोठं आव्हानच. पण, या गोंधळाच्या आणि थबकलेल्या वातावरणात एक गोष्ट मात्र थांबलेली नाही ती म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल.

पश्चिम रेल्वेनं शेअर केलेल्या एका भन्नाट व्हिडीओनं हे पुन्हा सिद्ध केलं, “मुंबई लोकल थांबली म्हणजेच मुंबई थांबली”. मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर साचलेल्या पाण्याला चिरत, ‘शिट्टी’ वाजवीत धावणाऱ्या या लोकलचा व्हिडीओ पाहताना क्षणभर तुमचाही श्वास रोखला जाईल. पावसाचा जोर एवढा मोठा आहे की, ट्रेनच्या खालून फेसाळलेलं पाणी उडताना दिसतंय; पण तरीही तिचा वेग कमी झालेला नाही.

आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे या व्हिडीओनं लोकांच्या मनात एकच भावना जागवल्या – “यालाच तर मुंबईचं स्पिरिट म्हणतात!” कारण- खऱ्या अर्थानं ही लोकल फक्त ट्रेन नाही, तर ती लाखो मुंबईकरांची रोजची धावपळ, त्यांचा विश्वास आणि त्यांच्या जगण्याचा आधार आहे.

सोमवारी सकाळी सलग सुटीनंतर ऑफिसला धावणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी होती. बाहेर पाऊस कोसळत होता, रस्त्यावर पाणी साठलं होतं. पणस नेहमीप्रमाणे लोकलनं या गर्दीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर पेललं आणि पावसाच्या पाण्याला चिरत ती पुढे धावतच राहिली.

याच वेळी पश्चिम रेल्वेनं (Western Railway) आपल्या अधिकृत X अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत मुसळधार पावसातही लोकलचा भन्नाट वेग वाटतो. पावसाच्या धारा अंगावर घेत, ट्रॅकवर साठलेलं पाणी कापत ती जशी वेगाने धावत होती, ते पाहून नेटकऱ्यांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. काहींनी तर थेट लिहिलं– “बस्स, यालाच तर मुंबईचं स्पिरिट म्हणतात!”

खरं तर मुंबई लोकल ही फक्त प्रवासाची सोय नाही, ती आहे शहराची लाइफलाइन. रोजच्या लाखो प्रवाशांना पावसात, उन्हात, गर्दीत आणि संकटातही सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची ताकद तिच्याकडे आहे. आणि या वेळीही तिनं आपल्या अस्तित्वासह महत्त्वाचं दर्शन घडवलं.

रस्त्यावर पाणी साठलंय, टॅक्सीवाल्यांनी हार मानली, रिक्षा बंद पडल्या, बसेस कासवाच्या गतीने सरकतायत… पण लोकल? ती मात्र अजूनही तितक्याच जोशात! हो, थोडा उशीर नक्की होतोय; पण लोकल थांबत नाही, मुसळधारेतही ती हार मानत नाही.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मुंबईकरांनी लोकल प्रशासनाचं मनापासून कौतुक केलं. “गर्दी असो वा गोंधळ, लोकल नाही तर मुंबई नाही”, असं म्हणत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. खरंच, या व्हिडिओनं पुन्हा एकदा सिद्ध केल – मुंबई लोकल म्हणजे फक्त ट्रेन नाही, तर ती शहराच्या हृदयाची धडधड आहे.