Mother Saves Daughter: पहाटे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन लहान मुली आणि तिची आई… रोजच्याप्रमाणे हातात पिशवी, पाठीवर दप्तर घेऊन त्या गडबडीत निघाल्या होत्या. शांत रस्ता, इकडे-तिकडे धावणारी माणसं, गाड्यांचा आवाज… सगळं काही नेहमीसारखंच वाटत होतं. पण, काही क्षणांतच एक अशी थरारक घटना घडली की, आईसमोरच लेकीचा जीव धोक्यात आला. पाहता पाहता घडलेली ती घटना आज संपूर्ण शहराला हादरवून टाकत आहे. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी सकाळी? आणि आईच्या धाडसामुळे कसा वाचला लेकीचा जीव?

आईसमोर घडलेली ती हृदयद्रावक घटना पाहून अनेकांचे हृदय द्रवलं आहे. शाळेत जात असताना एका छोट्या मुलीचा जीव अक्षरशः धोक्यात आला होता. आईची जागरूकता आणि क्षणाचाही विलंब न लावता तिनं दाखवलेल्या धाडसामुळे एक दुर्घटना मोठ्या अपघातात रूपांतरित होण्यापासून थांबली. सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ही घटना हैदराबादच्या जुन्या शहरातील याकुतपुरा परिसरातील मौला का चिल्ला भागात घडली. सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी दोन मुली आपल्या आईसोबत शाळेकडे जात होत्या. त्यापैकी एक मुलगी आईचा हात धरून चालत असताना दुसरी थोडी पुढे निघाली आणि अचानकच रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये कोसळली.

क्षणभरात संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. आईच्या डोळ्यांसमोर हे घडल्याने ती गर्भगळीत झाली; पण तिनं क्षणाचाही विलंब न लावता, लगेच मॅनहोलमध्ये डोकावून आपल्या लेकराला सुरक्षित बाहेर काढले. स्थानिक नागरिकदेखील तिच्या मदतीला धावून आले; मात्र ते येईपर्यंत आईने आपल्या चिमुरडीला वाचवले होते. मुलीचे वय सुमारे सहा वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने ती गंभीर जखमी न होता, किरकोळ दुखापतीवरच निभावले.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा व्हिडीओ पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. एवढ्या गर्दीच्या भागात मॅनहोल उघडा कसा ठेवला गेला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लोकांनी सरळ सरळ महापालिकेला (GHMC) निष्काळजीपणाबद्दल दोष देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आईने वेळीच धाडस दाखवले नसते, तर ही दुर्घटना एका निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या भयंकर अपघातात रूपांतरीत झाली असती,” अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत लोकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, वाढत्या दबावामुळे महापालिकेने (GHMC) मॅनहोल झाकण्याचे आणि संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, नागरिक आता फक्त आश्वासनावर न थांबता, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या बेफिकिरीचा पर्दाफाश केला असून, नागरिक विचारत आहेत, “आज चिमुरडी बचावली; पण उद्या आणखी एखाद्याचे जीवन धोक्यात गेले, तर जबाबदार कोण?”