एका ६० वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि मैनपुरी जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये जवळपास १५ मिनिटे उपचार न करता पडून राहिल्याने अखेर तिला प्राण गमवावे लागले. ऑन-ड्युटी डॉक्टर आदर्श सेंगर यांनी रुग्णाला बघण्याऐवजी मोबाइल फोनवर व्हिडीओ पाहून गंभीर वेळ वाया घालवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवेश कुमारी असे या महिलेचे नाव असून तिला मंगळवारी दुपारी रुग्णालयात आणण्यात आले. तिच्या कुटुंबीयांनी असा दावा केला की, तिची वैयक्तिक तपासणी करण्याऐवजी डॉ. सेंगर यांनी एका परिचारिकाला परिस्थिती हाताळण्याची सूचना केली.

वारंवार विनंती करूनही डॉक्टरांनी केलं दुर्लक्ष

रुग्णाच्या नातेवाइकांनी वारंवार विनंती करूनही डॉक्टर त्याच्या फोनमध्येच व्यग्र होते आणि नातेवाइकांच्या म्हणण्याप्रमाणे ते रील पाहत होते. जेव्हा प्रवेश कुमारी यांची प्रकृती बिघडली आणि त्यांच्या मुलाने त्या डॉक्टरांवर आरोप लावले, तेव्हा डॉ. सेंगरने त्याच्या कानशिलात लगावली, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर त्यांच्या डेस्कवर बसलेले दिसतायत आणि त्यांच्या फोनमध्ये मग्न आहेत. यादरम्यान त्या रुग्णाला नर्स तपासत असल्याचे दिसत आहे. तसंच या फुटेजमध्ये डॉक्टर रुग्णाच्या मुलाला कानाखाली मारतानाही दिसत आहेत.

हिंदी पोर्टल्सच्या वृत्तानुसार, मृत महिलेचा मुलगा, गुरु शरण सिंग याने त्याच्या आईच्या निधनाला कारणीभूत असलेल्या गोष्टींबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, त्याने त्याच्या भावांसह आईला रुग्णालयात नेले. तसंच त्याने डॉक्टरांना तिला उपस्थित राहण्याची विनंती केली, तथापि, वैद्यकीय प्रक्रिया करण्यासाठी एका नर्सला नियुक्त केले गेले.

प्रवेश कुमारी यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांच्या मुलाने डॉक्टरांना तिच्यावर उपचार करण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र, ते त्यांच्या फोनवर व्यस्त होते. त्यानंतर सिंग यांच्या आईच्या तोंडातून खोकल्यावाटे रक्त आल्याने ते घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. शेवटी, जेव्हा ती हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवर मरण पावली, तेव्हा त्याने आणि त्याच्या भावांनी डॉक्टरवर आरोप केले आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कानाखाली मारले.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला

मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मदन लाल यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, तपास सुरू करण्यात आला आहे. ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of elder woman dies because of doctor watches reels in manipur hospital viral video in up dvr