Rahul Gandhi selfie With Advocate Viral Photo : लाइटहाऊस जर्नालिझमला राहुल गांधींचा एक सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये एक दावा केला जात होता की, निकाल देण्यापूर्वी न्यायाधीश काँग्रेस नेत्यासोबत सेल्फी घेण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, चित्रात दिसणारी व्यक्ती न्यायाधीश नसून वकील आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (युजर) वृतिका यादव यांनी खोट्या दाव्यासह फोटो शेअर केला आहे आणि ‘विरोधी पक्षनेते राहुल गांधी लखनौ न्यायालयात हजर झाले आणि काय सांगू? न्यायाधीशही सेल्फी घेण्यापासून रोखू शकले नाहीत! खरोखर प्रेमळ नेता’, अशी कॅप्शन फोटोला दिली आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हा फोटो शेअर करीत आहेत.

तपास :

तपासादरम्यान, आम्हाला पोस्टवर काही कमेंट्स आढळल्या, ज्यात स्पष्ट केले होते की, सेल्फी घेणारा माणूस न्यायाधीश नसून वकील आहे.

एका युजर प्रशांत श्रीवास्तव यांनी नमूद केले की, चित्रात दिसणारी व्यक्ती न्यायाधीश नसून, लखनौमधील वकील सय्यद महमूद हसन आहेत.

दुसऱ्या एक्स (युजरने) हेदेखील स्पष्ट केले की, लखनौ बार असोसिएशनमधील ॲड्. सय्यद महमूद हसन होते. त्यातून आम्हाला वकिलांचे प्रोफाइलदेखील आढळले आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना वकिलांनी सांगितले की, महमूद हसन यांनी स्वतःच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले की, प्रसारित होत असलेला फोटो खरोखरच त्यांचा आहे. त्यांनी स्पष्ट केले, “मी राहुल गांधींना भेटायला गेलो होतो. पण, मी न्यायाधीश नाही; मी फक्त एक वकील आहे”

https://www.uptak.in/neighbouring-news/lucknow/story/did-the-judge-take-a-selfie-with-rahul-gandhi-who-came-to-appear-in-lucknow-court-know-the-full-introduction-of-the-person-in-this-picture-3186764-2025-07-15

निष्कर्ष : व्हायरल झालेल्या फोटोत निकाल देण्यापूर्वी राहुल गांधींबरोबर एक न्यायाधीश सेल्फी घेत असल्याचे म्हटले जात होते. पण, प्रत्यक्षात त्यात एक वकील काँग्रेस नेत्याबरोबर सेल्फी घेताना दिसत आहेत. त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.