Viral Video: हल्ली लूटमारी, चोरी, खोटं बोलून निष्पाप लोकांकडून पैसे उकळणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. लोक काहीही कष्ट न करता चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्यासाठी नवनवीन आयडिया शोधत असतात. पण, वाईट कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच. कितीही चलाखी केली तरी एकदिवस खोटे पितळ जगासमोर येतेच. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक धडधाकट व्यक्ती अपंग असल्याचे नाटक करताना दिसतोय.

या जगात जगण्यासाठी, दोन वेळचे पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत असतो. कष्ट करताना आलेल्या अडचणी, त्रास या सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. अनेक गरीब, अपंग व्यक्तीही काही ना काहीतरी काम करून पैसे कमावतात. खरेतर, माणूस पैसा किती कमावतो यापेक्षा तो समाजात जगताना स्वाभिमान तर गहाण ठेवत नाही ना, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, समाजात असे काही लोक आहेत, जे शरीराने धडधाकट असूनही कोणतेही कष्ट न करता पैसा कमावण्याचा मार्ग शोधत असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एक धडधाकट व्यक्ती मुद्दाम अपंग असण्याचे नाटक करताना दिसतोय.

हा व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकलमधील असून यामध्ये एक व्यक्ती मुद्दाम अपंग असल्याचे नाटक करत करत सर्वांकडे पैसे मागत आहे. ही गोष्ट हा व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात येते, त्यामुळे तो त्या व्यक्तीचा पाठलाग करतो. पुढे अपंग असल्याचे नाटक करणारा ट्रेनमधून बाहेर जातो आणि चक्क स्वतःच्या दोन्ही पायांवर चालत पुढच्या डब्यात जातो. त्याचा हा बनावट डाव पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @goga_ga या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एकाने लिहिलंय की, “खूप खतरनाक लोक आहेत भावा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “तो मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला होता”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मुंबईकरांनो सावध व्हा..”