Virar Local Fight Video: सोमवारी, २८ जुलै रोजी विरार-डहाणू लोकल ट्रेनमध्ये दोन पुरुषांमध्ये भांडण झाल्याची घटना घडली. ट्रेनमध्ये चढताना दोघांमध्ये सुरुवातीला धक्का-बुक्की झाली आणि नंतर हे भांडण मारामारीपर्यंत पोहोचलं.

विरार लोकलमधला व्हिडीओ व्हायरल (Virar Local Fight Viral Video)

FPJच्या वृत्तानुसार, हे भांडण त्यावेळी सुरू झाले जेव्हा वैतरणा आणि सफाळे स्टेशनदरम्यान ट्रेन पकडताना दोघेही एकमेकांना ढकलू लागले. पाहता पाहता हे भांडण विकोपाला गेलं आणि ते दोघे एकमेकांना मारहाण करू लागले.

एक प्रवासी भांडण थांबवण्यासाठी मध्ये पडला, पण त्यानेच दोघांनाही कानाखाली मारायला सुरुवात केली, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला. या भांडणात एकाने दुसऱ्याच्या बायकोचा विषय काढून भांडायला सुरूवात केली. त्यामुळे दुसरा माणूस म्हणत होता, “बायकोवर का जातोय?” म्हणजेच “माझ्या बायकोला यात का ओढतोयस?”

ही घटना इतर प्रवाशांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ म्हणून शूट केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना ढकलताना आणि मारताना दिसतात, तर काही प्रवासी भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ट्रेनमध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे हे भांडण वाढत गेलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @vani_mehrotra या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ”विरार-डहाणू मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी. सोमवारी काही प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना एकमेकांना धक्का दिल्याने हा वाद झाल्याचे सांगितले जाते. या वादाचे रूपांतर शारीरिक हाणामारीत झाले.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

आतापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून या घटनेवर कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. दररोजच्या या भांडणांमुळे लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे.

याआधी घडलेल्या अशाच एका घटनेत डोंबिवलीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यात काही महिलांमध्ये जोरदार भांडण झालं. बसण्याच्या जागेवरून वाद सुरू झाला आणि नंतर तो मारामारीपर्यंत गेला.

दरम्यान, या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज स्पष्ट झाली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून योग्य पावले उचलली पाहिजेत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री दिली पाहिजे.