नवी मुंबई : शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू होती.
सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने अनेकांनी पर्यटनस्थळ गाठले होते. त्यामुळे मागील आठवड्यात मुंबईबाहेर जाणाऱ्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी पाहायला मिळाली होती. तर मुंबईत परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यात पाऊस असल्याने यात भर पडली.
जुलैमध्ये शहरात व मोरबे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला होता. मागील आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरू असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर अधूनमधून वादळीवाराही वाहत आहे. ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वेस्थानक परिसरात तसेच शीव पनवेल महामार्गावर पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. घणसोली उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या भागात गेली अनेक दिवस सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कामोठेपासूनच मुंबईच्या दिशेने धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.
पावसामुळे नवी मुंबईतील भुयारी मार्गांत काही प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली.
आतापर्यंतचा पाऊस मिमीमध्ये
शहरात : २११२ मिमी
मोरबे : २४७१
आजचा पाऊस मिमीमध्ये
बेलापूर- ४२ मिमी
नेरुळ- ४३.४० मिमी
वाशी- ३८.५० मिमी
कोपरखैरणे- ४८.३० मिमी.
ऐरोली- ४५.२० मिमी
दिघा- ४२ मिमी.
सरासरी पाऊस- ४३.२३
ताप, सर्दीच्या रुग्णांत वाढ
नवी मुंबईत पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. महापालिका रुग्णालयांसह खासगी दवाखान्यात रुग्णांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. साथीचे आजार वाढत असून डेंग्यू, मलेरिया, टायफाइडचे रुग्ण अधिक असल्याचे घणसोलीतील एका खासगी क्लिनिकच्या डॉक्टरांनी सांगितले.