शासनाकडून मंजूर १४० कोटींचा निधी अन्य ठिकाणी वळवला
भाईंदर : मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला १४० कोटी रुपयांचा निधी अन्य ठिकाणी वळवण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली आहे. यामुळे कर्करोग रुग्णालय उभारणीचा निर्णय रद्द झाला असल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे.
मिरा भाईंदर आणि परिसरातील शहरांमध्ये एकही कर्करोग रुग्णालय नसल्यामुळे बाधित रुग्णांना मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी तीन वर्षांपूर्वी माजी आमदार गीता जैन यांनी राज्य शासनाकडे केली होती. यासाठी महापालिकेच्या आरक्षित भूखंडाचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने मिरा रोड येथील आरक्षण क्रमांक २१० व २११ निवडत १३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. यास १७ मार्च २०२४ रोजी शासनाने मंजुरी दिली होती. मात्र इमारत उभारणीदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हे काम थंडावले आहे.
दरम्यान, हा मंजूर निधी मिरा रोड येथील आरक्षण क्रमांक ३०२ येथे उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या ५०० खाटांच्या रुग्णालयातील फर्निचर व इतर कामांसाठी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ८ सप्टेंबर २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.यामुळे कर्करोग रुग्णालय उभारणीचा निर्णय शासनाने रद्द केला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नसून शासन योग्य तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.
उद्यान उभारण्याची मागणी
मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आलेली सदर जागा ही विकास आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित आहे. त्यामुळे याठिकाणी मंजूर निधी रुग्णालयासाठीच वापरला जात असल्यास आमचा आक्षेप नाही. मात्र आता या ठिकाणी नागरी सुविधेसाठी उद्यानाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी केली आहे.
कर्करोग रुग्णांसाठी राखीव खाटा?
मिरा रोड येथे कर्करोग रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेला निधी महापालिकेच्या नव्या रुग्णालयासाठी वर्ग करण्याची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मात्र, कर्करोग रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नव्या रुग्णालयात कर्करोग बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र राखीव खाटा ठेवण्यात येतील, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.