भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात झाडांची छाटणी केलेल्या वजनानुसार पैसे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र पैशाच्या लालसेपोटी कंत्राटदार झाडांच्या मोठ्या फांद्याही कापत असल्याचे उघडकीस आले असून, यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून अशा ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरातील रस्त्यांच्याकडेला, दुभाजकांवर आणि उद्यानांमध्ये महापालिकेने वृक्षलागवड केली आहे. या झाडांना नियमितपणे पाणी दिले जाते, तर पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या त्यांची पाण्याची गरज भागते.या काळात झाडांची वाढ झपाट्याने होते आणि त्यांची फांद्या व पाने बाहेर येतात.मात्र या वाढीमुळे झाडांच्या खोडांवर अतिरिक्त भार येतो आणि त्यामुळे झाड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून झाडांची वेळोवेळी छाटणी करण्यात येते. यासाठी महापालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाते.
यापूर्वी या कामासाठी निश्चित रक्कम अदा केली जात होती. मात्र त्यात अधिक खर्च होत असल्याने तत्कालीन आयुक्त संजय काटकर यांनी “कामाच्या मोबदल्यात पैसे” देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छाटणी केलेल्या फांद्यांचे आणि पालापाचोळ्याचे वजन करून त्यानुसार पैसे देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. हे काम करण्यासाठी जे. बी. इन्फ्राटेक या संस्थेची निवड करण्यात आली आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून अधिक पैसे मिळवण्यासाठी कंत्राटदार जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात फांद्या छाटत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अनेक वेळा झाडांच्या मुख्य फांद्याही तोडल्या जात असल्याने झाडे सुकून मरू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारांमुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे.