Ganesh visarjan 2025: भाईंदर : गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी विजेचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथील मोदी पटेल रोड परिसरात शनिवारी घडली. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्रतीक शाह (३४) असे मृत तरुणाचे नाव असून तो वसंत वैभव इमारतीत वास्तव्यास होता. शाह आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला ट्रॉलीवर बसवण्याचे काम करत असताना अचानक एका विद्युततारेच्या संपर्कात आला आणि जागीच कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला.शाह यांना वाचवण्यासाठी आणखी एक कार्यकर्ता पुढे धावला. मात्र त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यावेळी उपस्थितांनी प्रसंगावधान राखत बांबूच्या सहाय्याने त्या कार्यकर्त्याला विजेच्या तारेतून वेगळे केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रतीक शाह आपल्या पत्नी व पाच वर्षांच्या मुलासोबत गणेशदर्शनासाठी आला होता. दर्शनानंतर व आरती करून त्याने मंडळाच्या मूर्तीला विसर्जनासाठी ट्रॉलीवर ठेवले. त्यानंतर काही क्षणांतच हा अपघात घडला. विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.