भाईंदर : भाजप आणि स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध सुरू असतानाही दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. यासाठी लागणाऱ्या जागेचा शोध घेण्याची जबाबदारी शासकीय विभागांकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबईच्या दक्षिण तोंडाशी असलेला दहिसर पथकर नाका पुढे मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवाजवळ स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याला मिरा-भाईंदर आणि वसई–विरारमधील भूमिपुत्रांनी विरोध दर्शविला आहे.

भाजपने पथकर नाक्याच्या स्थलांतराला समर्थन दिले असले तरी जागेच्या प्रश्नावरून शिवसेनेला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मागील आठवड्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी वर्सोवा येथील वनविभागाची जागा कोणत्याही परिस्थितीत पथकर नाक्यासाठी देणार नसल्याचे आश्वासन भूमिपुत्र संघटनेला दिले होते. त्यामुळे या विषयावर भाजप–शिवसेना वाद उभा राहिला आहे. दरम्यान, दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा केला आहे. शासनाच्या या निर्णयाचे जनतेत स्वागत झाले असून पथकर नाक्याची समस्या दूर व्हावी, अशी प्रत्येक प्रवाशाची मागणी आहे. तरीदेखील काही जण राजकीय हेतूने या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सरनाईक म्हणाले की, सर्व समस्यांचे निवारण करून पथकर नाका लवकरच स्थलांतरित केला जाणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून शिंदे यांनी निर्णय घेतला आहे, तर यासाठी लागणारी जागा निश्चित करून अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय यंत्रणेकडे आहे. यासाठी एमएसआरडीसी विभाग सर्वेक्षण करत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाशीही पत्रव्यवहार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.