भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये कृत्रिम तलावात विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींची वाहतूक कचऱ्याच्या वाहनातून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा मिरा भाईंदर महापालिकेने सहा फुटांखालील सर्व गणेशमूर्तींचे सक्तीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात तब्बल ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या तलावांमध्ये भक्त विसर्जन करत असले तरी प्रक्रियेत अनेक गैरसोयी निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. विसर्जनादरम्यान मूर्तीची विटंबना होत असल्याचीही नाराजी गणेशभक्तांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारावर पोलीस प्रशासनाने देखील आक्षेप नोंदवला आहे.

दरम्यान, काशिमिरा येथील जरीमरी तलावाजवळ उभारलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या मूर्तींची चक्क कचऱ्याच्या गाडीतून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित झालेल्या मूर्तींचे एकत्रित संकलन करण्यासाठी महापालिकेने मिरा रोडच्या शिवार गार्डनजवळ एक केंद्र उभारले आहे. या केंद्रावर मूर्ती आणण्यासाठी मोठ्या ट्रकची सोय करण्यात आली असून त्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. मात्र काशिमिरा परिसरातील मूर्तींची वाहतूक दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या गाडीतून केल्याने स्थानिक गणेशभक्त संतापले आहेत.तर विसर्जित झालेल्या गणेश मूर्तीची वाहतुक करण्यासाठी उपायोजना आखण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. मात्र कचऱ्याच्या वाहनातून ही वाहतूक केली जात असल्यास त्याबाबत माहिती घेऊन उचित कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

कृत्रिम तलावातील पीओपीचा गाळ नैसर्गिक तलावात

काशिमीरा येथे जरीमरी या नैसर्गिक तलावाजवळ महापालिकेने यंदा कृत्रिम तलावाची उभारणी केली. त्यानुसार मागील सात दिवसात या तलावात मोठ्या संख्येने गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले आहे.हे विसर्जन झाल्यावर लगेचच कर्मचारी मूर्ती बाहेर काढून ठेवत आहेत. मात्र तरी देखील कृत्रिम तलावात व आजूबाजूला पीओपीचा गाळ पसरत आहेत.मात्र हा गाळ स्वच्छ करण्याऐवजी हे कर्मचारी त्यावर पाण्याचा मारा करून तो नैसर्गिक तलावात टाकत आहेत.परिणामी पुन्हा नैसर्गिक तलाव दूषित होत असल्याची बाब समोर आली आहे.