भाईंदर : मिरा भाईंदर मधील मराठी भाषिक मोर्च्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर मनसेने मोर्चा दुकानावरील मराठी पाट्याकडे वळवला आहे. या संदर्भात दुकानदारांना दोन दिवसाची मुदत दिली जाणार असून त्यानंतर थेट आंदोलन केले जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मिठाई विक्रेत्याला मनसे सैनिकांने मारहाण केल्याची घटना अलीकडेच घडली होती. या घटनेविरोधात शहरातील व्यापारी संघटने मोर्चा काढला होता.मात्र हा मोर्चा भाजप पुरस्कृत असून त्यातून मराठी माणसाला हीनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप मनसेने केले होते. तसेच या विरोधात ८ जुलै रोजी मराठी भाषिक मोर्चाचे आयोजन केले होते.मनसेचा हा राजकीय मोर्चा नसल्यामुळे त्यात सर्व पक्षीय नेते,मराठी संघटना व सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे दिसून आले. यामुळे शहरात मराठी नागरिकांची एकजूट दिसून येऊन याबाबतची चर्चा संपूर्ण राज्यभरात झाली.

त्यामुळे मराठी भाषेसाठी उभे राहिलेले हे वातावरण थंडावू नये म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील दुकानाच्या पाट्या देखील मराठी करून घेण्याकडे मनसेने आपला मोर्चा वळवला आहे.सुरुवातीला या दुकानदारांच्या पाट्या मराठी करून घेण्यासाठी महापालिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मनसेकडून पत्र दिले जाणार आहे. व त्यानंतर लगेचच कारवाई दिसून न आल्यास थेट मनसे स्टाईलने आंदोलन हाती घेणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी दिली आहे. प्रामुख्याने शहरातील व्यापारी संघटनेने मराठी भाषिकांविरोधात काढलेल्या मोर्चामुळे हा वाद उभा राहिला असून त्याचे तीव्र पडसाद येणाऱ्या काळात उमटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनधिकृत बांधकामांनाही लक्ष :

मिरा भाईंदर शहरात दुकानावरील मराठी पाट्यांबरोबरच तेथील अनधिकृत बांधकावर देखील कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यात पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण, वाढीव पत्रा शेड आणि मोकळ्या जागेवरील कब्जा अशा तक्रारींचा यात समावेश आहे.

” मिरा भाईंदर शहरात आता मराठीचे अस्तित्व ठळकपणे दिसून येईल असे काम केले जाणार आहे. यात प्रामुख्याने दुकानाबाहेरील मराठी पाट्या सक्तीने लावून घेतल्या जाणार आहे. सुरुवातीला प्रशासनामार्फत कारवाईची प्रतीक्षा केली जाईल. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शहरातील शंभर टक्के दुकानांच्या पाट्या मराठी करण्याचे काम मनसे करेल. याशिवाय दुकानदारांनी केलेले अतिक्रमण देखील आता मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. ” – संदीप राणे- मनसे शहरअध्यक्ष मिरा भाईंदर