भाईंदर : झाडांच्या फांद्यांपासून जळाऊ ठोकळे आणि खत निर्मिती करण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या प्रकल्पासाठी आता नव्या कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे. जुन्या कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिल्यामुळे मागील काही महिन्यांपासून हा प्रकल्प बंद होता. आता नवीन कंत्राटदार नियुक्त झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.
मिरा-भाईंदर शहरातून गोळा होणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळ्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती आणि फांद्यांवर प्रक्रिया करून जळाऊ ठोकळे बनवण्याचा प्रकल्प मिरा-भाईंदर महापालिकेने घोडबंदर येथील मोकळ्या जागेत उभारला आहे.या प्रकल्पातून तयार होणारे खत विक्रीसाठी उपलब्ध केले जाते, तर जळाऊ ठोकळे स्मशानभूमींमध्ये वापरले जातात. या प्रकल्पातील यंत्रसामग्रीची उभारणी महापालिकेच्या निधीतून करण्यात आली आहे.
सुरुवातीला हा प्रकल्प महापालिकेच्याच मार्फत चालवला जात होता. मात्र, प्रशासनातील मनुष्यबळाची कमतरता आणि कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन हे काम कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनाने कंत्राटदाराची निवड केली होती. मात्र, शहरातून निघणाऱ्या पालापाचोळ्याच्या तुलनेत उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत असल्याची तक्रार कंत्राटदाराने प्रशासनाकडे केली होती. यावर प्रशासनाने दाद न दिल्यामुळे त्याने काम बंद केले. परिणामी हा प्रकल्प ठप्प झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. दरम्यान, आता या प्रकल्पासाठी प्रशासनाने नव्या कंत्राटदाराची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
“महापालिकेच्या जळाऊ ठोकळे आणि खत निर्मिती प्रकल्पासाठी नव्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. याबाबत करारनामा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल.”- कल्पिता पिंपळे -उपायुक्त (उद्यान विभाग)
