भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात लहान वाहनांमधून धोकादायक पद्धतीने मालाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे कधीही दुर्घटना घडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदर परिसरात अनेक औद्योगिक कारखाने असून, त्याठिकाणाहून सतत साहित्याची ने-आण सुरू असते. मात्र, खर्च वाचविण्याच्या उद्देशाने काही कारखानदार गरज असतानाही मोठ्या वाहनांचा वापर न करता लहान वाहनांमधूनच ही वाहतूक करतात. परिणामी अशा वाहनांमध्ये ठेवलेले साहित्य अनेकदा बाहेर येऊन धोकादायक ठरते. वाहतुकीदरम्यान साहित्य कोसळल्याने अपघातही घडल्याच्या घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अशा धोकादायक मालवाहतुकीवर बंदी घालून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरीही शहरात सर्रासपणे अशी वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. क्षमतेपेक्षा जास्त साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनचालकांवर केवळ निमित्ताने कारवाई केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, पोलिस मात्र कडक कारवाईचा दावा करत आहेत.
महामार्गावरही धोकादायक वाहतूक
मिरा-भाईंदरप्रमाणेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरदेखील वाहनांमधून धोकादायक साहित्याची वाहतूक केली जाताना दिसते. भंगार वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त साहित्य भरले जाते. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची भीती असल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली आहे.