वसई: सहाशे कोटी रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या १२१ किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण करण्यात आले होते. मात्र या कामानंतर १ लाखाहून अधिक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे समोर आले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराला सूचना केल्या होत्या. परंतु आतापर्यंत केवळ ५० टक्के इतकेच पॅनल दुरूस्त झाले असल्याने ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचून राहणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. यातून सुटका व्हावी यासाठी महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम केले होते. या काँक्रिटिकरणाचे काम पूर्ण होऊन अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटून गेला आहे. याच दरम्यान महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले होते.
विविध ठिकाणी खड्डे, रस्त्याला तडे जाणे, वाहनांच्या चाकाच्या निशाणामुळे उंच सखल स्थिती निर्माण झाली असल्याने महामार्गावरून प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
याबाबत महामार्ग प्राधिकरणाने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १२१ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे १८ लाख इतके पॅनल तयार झाले होते. त्यापैकी जवळपास १.९ लाख इतक्या ठिकाणी रस्ता नादुरुस्त अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले होते. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावे अशी सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या.
त्यानंतर ही व्यवस्थित रित्या काम केले जात नसल्याने ठेकेदाराला २२ एप्रिल २०२५ रोजी नोटीस पाठवून सहा महिन्यात कामात सुधारणा करण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या आता नोव्हेंबर अखेर पर्यँत ही मुदत संपणार आहे. मात्र आतापर्यंत ठेकेदाराने ५० टक्के इतकेच रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे अजूनही विविध ठिकाणच्या भागातून नागरिकांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असल्याचे कारण ठेकेदाराने दिले असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मायक्रो सरफेसिंग ट्रीटमेंटद्वारे पॅनल दुरुस्ती
आतापर्यंत विविध ठिकाणी रस्ते नादुरुस्त असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता मायक्रो सरफेसिंग (micro surfacing) प्रक्रियेद्वारे दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी रस्त्यांवर पाणी, डांबरी इमल्शन, खडी आणि रसायने वापरून तयार केलेल्या मिश्रणाचा मुलामा दिला जाणार आहे. या प्रक्रियेच्या संदर्भात केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेकडे (CRRI) याचा अहवाल पाठवला आहे. अहवालाला संस्थेकडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल. पण, या कामातही ठेकेदाराने हरगर्जीपणा केल्यास त्याला काळ्या यादीत टाकले येईल, असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ठेकेदाराला वारंवार नोटीस
महामार्गावरील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेप्रकरणी महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला २०२४ च्या मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अनेक पत्रे आणि दोष सुधारण्यासाठी वेळ देणाऱ्या नोटीसा (क्युअर पिरियड नोटीस) बजावल्या होत्या. मात्र, यानंतरही रस्ते दुरुस्तीच्या कामात फारसा फरक पडला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या दुरुस्तीसाठी मायक्रो सरफेसिंग प्रक्रियेचा वापर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावले जाईल. – सुहास चिटणीस, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
