वसई : मागील काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग व घोडबंदर महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका वसईतून ठाणे, नवीमुंबई या भागात कामासाठी जाणाऱ्या नोकरदारांना बसू लागला आहे. सतत कोंडीमुळे कामाच्या ठिकाणी उशिरा नोंद होत असल्याने नोकरीवरून काढून टाकण्याची शक्यता असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.
मागील काही वर्षांपासून नवीमुंबई, ठाणे, ऐरोली, घणसोली अशा विविध ठिकाणच्या भागात मोठं मोठ्या कंपन्या व त्यांची कार्यालये तयार झाली आहे. त्या ठिकाणी वसई विरार भागातून मोठ्या संख्येने नागरिक नोकरीसाठी आहेत. त्यांना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व घोडबंदर ठाणे मार्गाने दैनंदिन प्रवास करावा लागतो. मात्र मागील काही महिन्यांपासून घोडबंदर घाट, गायमुख, हॉटेल फाऊंटन जंक्शन व मुख्य राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी पडलेले खड्डे व वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
सततच्या वाहतूक कोंडीचा नोकरदार वर्गाला मोठा फटका बसू लागला आहे.वसई विरार मधून चार ते पाच हजार इतके नोकरदार या मार्गाने प्रवास करतात. मात्र पाच ते सहा तास कोंडीत जात असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. या मार्गावरील अपुऱ्या पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्थापनाच्या अभावामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवासी नोएल दिब्रिटो यांनी सांगितले आहे. याबाबत वसई विरार ते ठाणे ऐरोली दैनंदिन प्रवासी संघटनेने वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांच्याकडे निवेदन सादर केले असून यावर तोडगा काढण्याची मागणी आम्ही केली असल्याचे प्रसाद लेमोस यांनी सांगितले आहे.महामार्गावरील खड्डे दुरुस्तीची कामे सुरूच असून ९० टक्के खड्डे बुजविले असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने केला आहे.
नोकरीच्या संधीवर परिणाम
ठाणे नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असल्याने वसई विरार भागातील मोठ्या संख्येने तरुण त्या ठिकाणी कामासाठी जात आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचत नसल्याने कामावर नेहमीच लेटमार्क लागू लागला आहे. त्यामुळे कामावरून काढून टाकण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे प्रवासातील विलंबामुळे अनेक कंपन्या वसई-विरार येथील उमेदवारांना नोकरी देण्यास नाखूश असल्याचे नोकरदारांनी सांगितले आहे.
प्रमुख मागण्या काय ?
पीक अवर्समध्ये अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करणे व जड वाहनांकडून होणाऱ्या उलट्या बाजूने चालविण्याविरुद्ध कठोर कारवाई करणे.
घोडबंदर रोड, गायमुख घाट व महामार्ग-४८ वरील खड्डे तातडीने भरणे व पुनर्बांधणी करणे.
जड वाहनांच्या हालचालीवर नियंत्रण, विशेषतः पीक अवर्समध्ये.
नायगाव फ्लायओव्हर व इतर प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करणे.
वसई जेटी ते ठाणे जेटी व पुढे एरोलीपर्यंत रो-रो सेवा सुरू करणे.
वसई–विरार ते पनवेल, दिवा दरम्यान पीक अवर्समध्ये गाड्या चालविणे. सध्या फक्त दोन गाड्या डहाणूहून चालतात. वसई–ठाणे दरम्यान स्वतंत्र गाडी सुरू करणे.
घोडबंदर मार्गाची लवकरच दुरुस्ती
घोडबंदर मार्गावरील जवळपास सहा किलोमीटर घाटरस्ता ३० मीटर ऐवजी ६० मीटर रुंद करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.तसेच या मार्गाची जबाबदारी आता ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून मिरा भाईंदर महापालिकेवर सोपवण्यात आली आहे.त्यानुसार, या कामासाठी बाधित होणाऱ्या खाजगी जमिनी ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जमीनमालकांना नोटिसा बजावल्या आहेत.तसेच जागा हस्तांतराची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या देखभाल- दुरुस्ती साठी वार्षिक साडेपाच कोटीच्या खर्चाची तरतूद करण्यात आली असून लवकरच या कामास सुरुवात करण्याचा ठराव महापालिकेने २२ ऑगस्ट २०२५ रोजी मंजुर केला आहे.