विरार : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पालघर जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असून काही धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी धरणात सध्या ९२ टक्के इतका पाणीसाठा असून उसगाव आणि पेल्हार धरणे तुडुंब भरून वाहत आहेत.

वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाअंतर्गत धामणी धरणातून दररोज २०० दशलक्षलीटर पेल्हार मधून १० दशलक्षलीटर आणि उसगाव धरणातून २० दशलक्षलीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या योजनेतून १८० दशलक्षलीटर असा एकूण ४०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा शहरात होतो. शुक्रवार पासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे, तलाव या तुडुंब भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः ज्या धरण तलावातून नागरिकांना वर्षभर पाणी पुरवठा केला जातो त्यातील जलसाठा वाढला आहे.

जून आणि जुलै महिन्यात आनियमित पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा जोर धरल्याने तसेच गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पेल्हार आणि उसगाव धरणे तुडुंब भरली आहेत. जुलै अखेरीस पूर्ण क्षमतेने भरणारी धरणे यंदा ऑगस्ट महिन्यात तुडुंब भरली आहेत. तर धामणी धरण रविवारपर्यंत ९२.३२ टक्के भरले होते अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

धामणी धरणाची एकूण क्षमता २७६.३५ टीएमसी इतकी आहे. जुलै महिन्यात धरणात ७६ टक्के इतका पाणीसाठा होता. मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सध्याचा पाणीसाठा २५५.२१ (९२.३२ टक्के) पोहोचला आहे. पेल्हार धरणाची क्षमता ३.५६ दशलक्ष घनमीटर असून उसगाव धरणाची क्षमता ४.९६ दशलक्ष घनमीटर असून ही दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाल्याचे दिसून येत आहे.

पाझरतलाव ही तुडूंब

नायगाव पूर्वेच्या भागात चंद्रपाडा वाकीपाडा परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाझर तलाव तयार करण्यात आले आहे.उन्हाळ्यात हे तलाव पूर्णतः आटून गेले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या तलाव तुडूंब भरून गेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला आहे. सद्यस्थितीत हा तलाव ओसंडून वाहत असल्याने तलावाच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धरणसाठा (आकडे टक्केवारीत )

धामणी – ९२.३२

उसगाव – १००

पेल्हार – १००