भाईंदर :- सूचना देऊनही बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील आयुक्त आणि उपायुक्त यांच्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतापले आहेत. याबाबत त्यांनी थेट राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौरा करून महापालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महापालिका, एमआरडीए, प्रादेशिक परिवहन, वन विभाग, अप्पर तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांनाही बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार भाईंदर पश्चिम येथील मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात सोमवारी ही बैठक पार पडली. मात्र, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातून केवळ वाहतूक विभागाचे उपायुक्तच बैठकीला हजर होते. परिणामी, विविध विकासकामांशी संबंधित कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस भूमिका मांडण्यासाठी आयुक्त किंवा उपायुक्त हजर नव्हते.
या गैरहजेरीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण विचारले. यावेळी,पोलीस विभागाला उपस्थित राहण्याचे पत्र पाठवूनही ते आले नसल्याची माहिती मंत्र्यांच्या सचिवांनी दिली. त्यावर सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचे आदेश दिले. याशिवाय, या प्रकरणी कॅबिनेट बैठकीतही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाब विचारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.