वसई : वसई पश्चिमेच्या खोचिवडे परीसरात तृतीयपंथींच्या वेशात येऊन शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वसई पोलिसांनी चारही जणांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वसईतील खोचिवडे गावातील दोन शाळकरी मुली नेहमीप्रमाणे मुळगाव खारेकुरण येथून सायकल वरून येत होत्या. यावेळी रिक्षा क्रमांक एम एच ०४ एफ सी ९७३४ या रिक्षांतून आलेल्या तिघांनी या शाळकरी मुलींना चाकूचा धाक दाखवून पळून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तृतियपंथीयांचे वेश परिधान केला होता. या प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी तात्काळ सायकल घेऊन घराच्या दिशेने धाव घेतली आणि घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. मुलींनी माहिती देताच, गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रिक्षाचालक व तृतीयपंथीना अशा चौघांना चांगलाच चोप दिला. वेळीच पोलीस घटनास्थळी येऊन चारही जणांना ताब्यात घेतले आहे.

यात शरद शिंदे, संजय गोलनकर, निलेश मांडोक, रिक्षा चालक सुरज मातोल अशी या आरोपींची नावं असून त्यांची चौकशी करून पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी सांगितले आहे.