वसई:- शहरातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने विविध ठिकाणी पार्किंग नो पार्किंग साठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र नो पार्किंग क्षेत्रातही वाहने उभी करण्याचे प्रकार सुरूच असल्याने शहरातील वाहतूक धोरणावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वसई विरार शहर हे मुंबई जवळचे शहर असल्याने मागील काही वर्षांपासून येथील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या सोबतच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक नियोजन करणे कठीण होऊन बसले. वाहतूक कोंडी, वाहनतळ प्रश्न, अपुरे रस्ते अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
या वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी वसई विरार, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने स्थानिक महापालिकेच्या मदतीने शहराचे सर्वेक्षण करून ऑक्टोबर २०२३ मध्ये वाहतूक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता. यात वसई विरार शहरात २१५ ठिकाणी पार्किंग व नो पार्किंग, ५ ठिकाणी एकदिशा मार्ग, गर्दीच्या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी यांचा समावेश आहे.
सूचना फलक बसविण्यात यावे यासाठी वाहतूक विभागाने पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता त्यानुसार पालिकेने नऊ प्रभागात निश्चित केलेल्या ठिकाणांवर आतापर्यंत सातशेहून अधिक ठिकाणी पार्किंग व नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाही शहरात अजूनही नो पार्किंग फलकाच्या ठिकाणी वाहने पार्किंग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनासाठीच्या केलेल्या उपाययोजना फोल ठरत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. शहरात विविध वाहने पार्किंग- नो पार्किंग फलक लावले जात आहेत. त्यावर कारवाई सुरूच आहे. पुन्हा एकदा मोहीम राबवून कारवाई हाती घेतली जाईल असे वाहतूक विभागाने सांगितले आहे.
अतिक्रमण आणि नियोजनाचा अभाव
या समस्येसाठी केवळ वाहनचालकच नव्हे, तर स्थानिक प्रशासनही जबाबदार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरात पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत, आणि पालिकेने बहुमजली पार्किंगसारख्या पर्यायी व्यवस्था उभारल्या नाहीत, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.