वसई: मिरा-भाईंदर -वसई-विरार आयुक्तालयाने एप्रिलमध्ये व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केले होते. मात्र हे चॅनल गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांपर्यंत विविध महत्त्वाचे संदेश आणि सूचना सहज पोहोचवता याव्यात म्हणून हे चॅनेल सुरू करण्यात आले होते.
तत्कालीन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते १३ एप्रिल २०२५ रोजी या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन झाले होते. महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसीय कृती आराखड्यातील ७ कलमी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता. नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्याशी सहज संपर्क साधता यावा, हा यामागील मुख्य उद्देश होता.
सुरुवातीला या व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे वाहतुकीची माहिती, पोलिसांचे विविध उपक्रम, सुरक्षिततेसंदर्भात आणि कायदेशीर संदेश, तसेच आपत्कालीन परिस्थितीतील सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात सक्रिय असलेले हे चॅनेल गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजेच जून आणि जुलै महिन्यांपासून निष्क्रीय झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चॅनेलवर कोणताही महत्त्वाचा संदेश किंवा सूचना दिसत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
याबाबत मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, व्हाट्सअप चॅनेल सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तीन तासांत ५ हजार फॉलोअर्स, पण नंतर गती मंदावली
१३ एप्रिल रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन केल्यानंतर अवघ्या तीन तासांत ५ हजार नागरिकांनी प्रतिसाद देत चॅनेलला फॉलो केले होते.मात्र चॅनेलच्या सक्रियते अभावी नागरिकांचा प्रतिसाद कमी होत गेला. मागील तीन महिन्यांत केवळ ५५७ फॉलोअर्सची यात भर पडली आहे. यामुळे आयुक्तालयाची आधुनिकीकरणाची मोहीम अवघ्या तीन महिन्यांतच थंडावली असल्याचे चित्र दिसून येत आहे.