मानसी जोशी

तलावांचे शहर ते महामुंबई असा ठाणे शहराचा विकास झपाटय़ाने होत आहे. शहराच्या विकासासोबत सांस्कृतिक विकासही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ठाणे शहराची ओळख ही सांस्कृतिक शहर म्हणून पहिल्यापासूनच होती, मात्र आता यामध्येही काही बदल झाले आहेत. व्याख्याने, चर्चासत्रे या पंरपरागत कार्यक्रमांमध्ये बदल होऊन आबालवृद्धांपासून प्रत्येकालाच आकर्षित करणारे असे सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्याच्या सांस्कृतिक व्यासपीठांवर होऊ लागले. ठाणेकर रसिकांनीही त्याला आपलेसे केले. आजच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मता सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जोपासणाऱ्या ठाणे शहराच्या बदलणाऱ्या सांस्कृतिक ध्यासाचा आढावा घेऊ या..

मुंबईनंतर सांस्कृ तिक, आर्थिक आणि सामाजिक गोष्टींसाठी ठाणे शहराकडे पाहिले जाते. तलावांचे शहर अशी ओळख असणाऱ्या शहरात काळानुरूप बदल होत गेले. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेताना ठाण्याची व्याप्ती वाढली. मुंबईतील जागेचे भाव गगनाला भिडलेले असताना गेल्या दोन दशकांत पिढीच्या पिढी ठाण्यात स्थायिक झाली. त्याच काळात शहरात आयटी पार्क, औद्योगिक व्यवसायांनी पाय रोवल्यावर ठाणे शहराचा आकार आणि लोकसंख्याही वाढली. आज ठाणे येथे कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर येथून नोकरी आणि व्यवसायानिमित्त विद्यार्थी, तरुण मोठय़ा प्रमाणावर येतात. त्यामुळे ठाणे हे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ठाणे शहराच्या या बदलणाऱ्या प्रक्रियेत सांस्कृतिक बदलाचाही तितकाच मोठा वाटा आहे. ठाणे शहराचा सांस्कृतिक बदल हा पूर्वीच्या एकपात्री अभिनय-नाटक ते आजच्या स्टॅण्डअप कॉमेडीपर्यंतचा आहे. ठाण्याच्या सांस्कृतिक अंगात येथील नाटय़गृहांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृह आणि कल्याण येथील आचार्य अत्रे नाटय़गृह, कल्याण गायन समाज ठाणे आणि आसपासच्या उपनगरांचा एक सांस्कृतिक चेहरा आहे. अनेक चांगल्या दर्जाची नाटके, पुरस्कार सोहळे आणि समारंभ या ठिकाणी होत असतात. मात्र केवळ मराठीच नव्हे तर विविध भाषांतील नाटके या ठिकाणी होत असतात.

या नाटय़गृहांबरोबरच बदलणाऱ्या सांस्कृतिक चळवळीत शहरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचा आणि कट्टय़ांचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. शिवसमर्थ शाळेचे पटांगण, घंटाळी परिसरातील सहयोग मंदिर, नौपाडय़ातील सरस्वती क्रीडा शाळेचे संकुल आणि राम मारुती मंदिर भागातील न्यू इंग्लिश शाळेचा परिसर, नौपाडा येथील हितवर्धिनी सभागृह यांसारख्या विविध परिसरांमध्ये असणाऱ्या सभागृहांमध्ये विविध चर्चासत्रांचे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या ठिकाणी जागतिक विषयांवर भाष्य करणारे, जगातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम होत आहेत. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला, आयपीएच संस्थेतर्फे आयोजित वेध परिषद, पंडित राम मराठे संगीत महोत्सव या कार्यक्रमांमध्ये ठाणेकर रसिकांना विविध कलांची, व्याख्यानांची मेजवानी अनुभवायला मिळते. शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय नृत्य आणि संगीताबरोबर गझल, सुफी संगीत यांचेही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्यासाठी नाक मुरडणारी तरुणाई आता कात टाकणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी दर्शवत आहेत. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे स्टॅण्डअप कॉमेडीचे कार्यक्रम ठाणे आणि कल्याण भागांत आयोजित केले जात आहे.

ठाण्याच्या सांस्कृतिक बदलात विविध सांस्कृतिक कट्टेही बदलताना पाहायला मिळत आहेत. तरुणांच्या कलेला व्यासपीठ मिळावे यासाठी ठाण्यात प्रथमच २००१ मध्ये संपदा वागळे आणि विदुला ठुसे यांनी आचार्य अत्रे कट्टय़ाची मुहूर्तमेढ रोवली. सलग १८ वर्षे महिन्यांच्या दर बुधवारी भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यान या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या चार ते पाच वर्षांत शिरीष पै काव्यकट्टा, ब्रह्मांड, कुसुमाग्रज आणि अभिनय यांसारखे विविध सांस्कृतिक कट्टे नावारूपास आले. या कट्टय़ांवर कवितांचे अभिवाचन, पुस्तक प्रकाशन, संगीताचे आणि नृत्याचे कार्यक्रम होतात. मात्र आता या कार्यक्रमांचा आशय बदलत चालला आहे. गडकरी रंगायतन परिसरातील गडकरी कट्टा हे नवोदित कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ आहे. तेथील हॉटेलमध्ये मिळणारा वडा, जवळच मामलेदारची मिसळ यावर ताव मारत विविध तरुणांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृ तिक चर्चेला उधाण येते. ठाण्यातील सांस्कृ तिक जगात काय नवीन घडते आहे याची खबर ठाणेकरांना गडकरी कट्टय़ावर मिळते. हे सांस्कृतिक कट्टे संगीत आणि नृत्य कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता या कट्टय़ांवर विविध विषयाशी संबंधित चर्चा आयोजित केल्या जात आहेत.

शहरातील वाचनालयेही ठाण्याची संस्कृती अधिक समृद्ध करतात. शहराला अनेक जुन्या वाचनालयांची परंपरा लाभलेली आहे. ठाण्यातील कोर्टनाका येथील मराठी ग्रंथसंग्रहालय तसेच ठाणे नगर वाचन मंदिर आणि सावरकर ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणारे ग्रंथदिंडी, आदान-प्रदान सोहळा, चर्चासत्रे हे औत्सुक्याचे विषय आहेत. बदलत्या काळानुसार ही वाचनालयेही कात टाकत आहेत. या ग्रंथालयांमध्ये जागतिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सांस्कृतिक बदलांमध्ये ठाण्यातील नवरात्री आणि दहीहंडी या उत्सवांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ठाण्यातील दहीहंडी उत्सवांमध्ये परदेशी नागरिकही मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असतात. गुढीपाडवा, दिवाळी पहाट या वेळेस तलावपाळी, राम मारुती रस्ता गर्दीने फुलून जातात. गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध राज्यांतील संस्कृतीचे दर्शन घडते. ठाण्यात आयोजित केल्या जाणाऱ्या उपवन आर्ट, कळवा आणि अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय  कलाकार सहभागी होऊन त्यांची कला सादर करत आहेत.