‘सोने की चिडिया’ असणारा भारत देश आता सोनियांच्या हातातील चिडिया बनला आहे. त्याला पुन्हा ‘सोने की चिडिया’ बनविण्यासाठी सोनियांच्या हातातून मुक्त करण्याची गरज आहे, या शब्दात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार बलबीर पुंज यांनी काँग्रेसवर टीका केली.
फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्यावतीने गुरुवारी ‘समृद्ध भारताची संकल्पना’ या विषयावर जवाहर वसतिगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार नागो गाणार, पूर्ती समूहाचे संचालक सारंग गडकरी, रमेश गिरडे, संयोजक आर.पी. सिंग, शिखा त्यागी, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते.
काँग्रेसने ज्यांना पंतप्रधानपद दिले, त्यांना अधिकार दिले नाहीत. प्रणव मुखर्जीसारखा मातब्बर नेता असतांनासुद्धा, ते केवळ डोईजड होतील या भीतीपोटी त्यांना पंतप्रधानपदापासून डावलण्यात आले, असा आरोप खासदार पुंज यांनी केला. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. भारतात आल्यानंतर सोनिया गांधी यांनी अनेक वष्रे भारताचे नागरिकत्त्व स्वीकारले नव्हते. रेस्तराँमध्ये काम करणाऱ्या सोनिया गांधी यांना प्रशासकीय अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्यावर देशाची धुरा कशी सोपवायची, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. विकासाच्या बाबतीत अनेक देश आपल्यापुढे गेले आहेत. त्यामुळेआता देशासमोरील समस्यांवर केवळ चर्चा न करता मतदानातून हे परिवर्तन घडवून आणावे लागेल. हिंदूत्व आणि प्रगती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत, भाजप छोटय़ा राज्यांबाबत आग्रही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विकासाबाबतची भाजपची भूमिका मांडली.

भाजपात कोणतेही अंतर्गत वादविवाद नसल्याचे खासदार बलबीर पुंज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच मोदीसुद्धा चांगले वक्ते आहेत. नागपुरात भाजपाचा विजय निश्चीत आहे आणि म्हणूनच याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा याठिकाणी घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशभरातच मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि भाजपा २७२ पेक्षाही अधिक जागा मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी सांगत आहेत तोच भाजपचा जाहीरनामा असून, देशाचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.