काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार दुसऱ्या यादीत जाहीर झालेला नसल्याने काँग्रेसच्या वतीने या बैठकीला प्रतिनिधी हजर नव्हता. या जिल्हय़ात माजी खासदार नरेश पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे असे दोन गट सक्रिय आहेत. वणी येथून माजी आमदार वामनराव कासावार यांचे नावसुध्दा यादीत आहे. मात्र उमेदवारीची माळ कुणाच्या गळय़ात पडते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच या बैठकीला काँग्रेसच्या एकाही गटाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हजर नव्हते.
लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष व उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी राजकीय पक्षांच्या बैठकीत सांगितले.
निवडणूक व नामनिर्देशनासंबंधी आज विविध राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक दामोधर नान्हे, पुरवठा अधिकारी आर. एस. आडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. वाहन, सभा, रॅली, नेत्यांच्या सभा, बैठका आदिसाठी लागणारी परवानगी एकाच ठिकाणी मिळावी यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना वेगळे बँक खाते उघडणे बंधनकारक असणार आहे. निवडणुकीसंबंधी सर्व खर्च याच खात्यातून करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून १५ ते २२ मार्चपर्यंत सकाळी ११ ते १३ वाजेपर्यंत प्राप्त होणार आहेत.
याच कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी वा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. नामनिर्देशनपत्रासोबत २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून अनुसूचित जातीच्या उमेदवारास १२ हजार ५०० रुपये अमानत रक्कम भरावी लागेल. मात्र सोबत जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अनामत रक्कम डीडी किंवा धनादेशाद्वारे स्वीकारली जाणार नाही. रोख कोषागारात किंवा रिझव्र्ह बँकेत भरलेली पावती स्वीकारल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक खर्चाचा हिशोब चोख ठेवण्याबाबत आयोग आग्रही असून उमेदवारांकडून निवडणुकीवर केलेल्या खर्चाचा तपशील विहीत नमुन्यात दररोज दुपारी २ वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक राहील. खर्चाचा बाबनिहाय तक्ता नामनिर्देशन पत्र दाखल करताना पुरवण्यात येईल. उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी पक्षातर्फे झालेला खर्च निवडणूक आयोगाकडे परस्पर सादर केला जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवारांनी एक प्रस्तावक व इतर उमेदवारांनी १० प्रस्तावक नामनिर्देशनपत्रात नमूद करणे आवश्यक आहे. पक्षातर्फे दिल्या जाणाऱ्या बी फार्मची शाईची प्रत सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचाराची परवानगी
८ एप्रिलपर्यंतच राहणार असून मतदानाच्या ४८ तास अगोदर प्रचार बंद करणे बंधनकारक असणार आहे.
निवडणुकीच्या वेळी लागणाऱ्या साहित्याचे दर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना सादर केले असून या दरासंदर्भात काही म्हणणे असल्यास ते मांडावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपचे प्रशांत घट्टवार, राहुल सराफ, राजेंद्र कागदेलवार, राष्ट्रवादीचे शरद मानकर, बसपाचे अॅड. सी. आर. खोब्रागडे, मनसेचे सुरेश तालेवार, सीपीआयचे संतोष दास उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
निवडणुकीसाठी पक्ष व उमेदवारांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा उमेदवार दुसऱ्या यादीत जाहीर झालेला नसल्याने काँग्रेसच्या वतीने या बैठकीला प्रतिनिधी हजर नव्हता.
First published on: 15-03-2014 at 06:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different election permissions at one place for parties candidate